एचपीटी आरवायके महाविद्यालयातर्फे ‘आम्ही जिजाऊ – सावित्रीच्या लेकी’ उपक्रमाचं उद्घाटन

0
37

अश्विनी भालेराव
नाशिक प्रतिनिधी : एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयातर्फे ‘आम्ही जिजाऊ – सावित्रीच्या लेकी’ या अभिनव उपक्रमाचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उद्घाटन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागातील निवडक विद्यार्थिनी नाशिक शहरातील विविध शाळांमधून शालेय विद्यार्थिनींचे संवादाच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत.

महाविद्यालयातील विद्यार्थिनी शालेय विद्यार्थिनींशी वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, मासिक पाळी, मानसिक स्वास्थ्य, आणि सोशल मीडिया तसेच पुढे असणाऱ्या करीयरच्या संधी याबाबत संवादात्मक मार्गदर्शन करणार आहेत. याची सुरुवात मृणाल बच्छाव, दिव्या जोशी, अल्फिया डांगे या विद्यार्थिनींद्वारे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात करण्यात आली.

उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. एन.सूर्यवंशी यांनी मनोगतात सांगितले की, विद्यार्थिनींच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबवला जात आहे. शाळा हा आपल्या जीवनात महत्त्वाचा टप्पा आहे. याच शालेय जीवनात चांगलं काय, वाईट काय अशा जाणीवा निर्माण होत असतात. म्हणूनच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून विद्यार्थिनींना भविष्यातील संधी काय हे सांगणे, त्यांचे प्रबोधन करणे हा उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीला हार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी लेखक, कवी, अभिनेते अरुण इंगळे यांनी ‘ शिक पोरी शिक ‘ ही कविता सादर केली.

यावेळी प्राचार्य डॉ. व्ही.एन.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, विद्यार्थिनी मंचच्या प्रमुख आणि उपक्रमाच्या समन्वयिका प्रा.अनुराधा अहिरे, हिंदी विभागप्रमुख डॉ.विजयकुमार अवस्थी, प्रा. डॉ. संजय अहिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका कसबे मॅडम, पर्यवेक्षक शिंदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here