माही सोनार
द पॉईंट नाऊ : देवळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाची एकहाती सत्ता अन राष्ट्रवादीची झालेली तालुक्यातील दयनीय अवस्था हे ताजे असतांना , उदयकुमारांनी आपली राजकीय ‘एक्सझिट’ घोषित केली. तालुक्यातील राजकारणात उदयकुमार आहेर विरुद्ध केदा आहेर हा राजकीय संघर्ष मोठा आहे, केदा आहेरांनी चलाखीचे राजकारण करत कधीही उदयकुमारांच्या टीकेला उत्तर दिले नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात उदयकुमारांना केदा आहेरांनी उत्तरे दिले असते तर उदयकुमारांनी अजून आक्रमक होत मुद्द्यांचा बुरखा फाडला असता. ते नानांना परवडणारे कधीही नव्हते, दुसरं म्हणजे नाना म्हणतात की मी जिल्ह्याचे राजकारण करतो मला असल्या छोट्या मुद्द्यांना महत्त्व द्यावे असे कधी वाटले नाही. आणि म्हणून मी प्रतिक्रिया देत नाही मात्र दुसरीकडे दादा देखील राज्याचे राजकारण करता त्यामुळे या मुद्द्यात तथ्य राहत नाही.
दादांकडे जी वक्तृत्व शैली आहे ती अतिशय आक्रमक आहे, ती कोणालाही न परवडणारी आहे. त्यांच्या बाण्याने समोरचा घायाळ झाल्याशिवाय राहत नाहीत. देवळ्यात त्यांच्या पाठीशी कार्यकर्ता कमी असेल मात्र राज्यभर त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, ते मंत्रालयात देखील थेट जाऊ शकता सर्व पक्षीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अगदी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे ,अजित पवार, छगन भुजबळ यासह अन्य नेत्यांशी त्यांचे थेट संबंध आहेत. गेल्यावेळी शिवजयंती दिनी देवळ्यातील नेते देवळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालत असतांना उदयकुमार आहेर बस मधून उतरले अन घराकडे चालले त्यावेळी काही युवकांनी खिल्ली उडवली की दादा फक्त बसच्या वाऱ्याच करतोय. दुसऱ्या दिवशी दादांचे फेसबुकवर फोटो आलेत त्यात ते शिवनेरीवर संभाजीराजे भोसले, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या दिगगजांच्या लाईनीत बसलेले होते तेव्हा सर्व आवाक झालेत. यामुळे उदयकुमारांना वेळोवेळी तालुक्यातील काही ठराविक लोक जे हिनवता ते तोंडावर आपटले आहेत. सांगायचे तात्पर्य इतकेच की या माणसाला तालुक्याने जरी नाकारले असले तरी दबदबा मात्र बाहेर अफाट आहे.
मूळ मुद्दा असा दादांनी विनायक मेंटेनसोबत 20 वर्ष राजकारण केले, तस शिवसंग्राम म्हणजे संघटना म्हणूनच बघितले जाते. राजकीय पक्ष म्हणून त्याला वलय नाही. कार्यकर्ते पूर्वीसारखे सोबत नाहीत. यामुळे तालुक्यात दादांना मानणारा वर्ग मोठा आहे मात्र त्यांना शिवसंग्राम मान्य नाही. दादांनी स्वगृही अर्थात राष्ट्रवादीत परतावे यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे तर काही राज्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राजकारणातून बाहेर न जाता पक्ष बदलावा जेणेकरून कार्यकर्त्यांना अन त्या पक्षाला सुगीचे दिवस येतील असा सर्वसामान्यांचा कयास आहे. राष्ट्रवादी प्रवेशासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी व उदयकुमारांना मानणाऱ्या वर्गाकडून दादांवर मोठा दबाव येत आहे. मात्र दादा अद्यापही आपल्या एक्सझिटच्या भूमिकेवर ठाम असल्याने कार्यकर्त्यांचा व मानणाऱ्या वर्गाचा हिरमोड होत आहे. याचा विचार सुज्ञ दादांनी करणे गरजेचे आहे. काहीवेळा आपले तत्व देखील बाजूला ठेवावे लागतात याचा विचार होणे गरजेचे आहे.
उदयकुमारांनी नवोदय क्रांतीच्या माध्यमातून कार्य करण्याचे घोषित केले आहे. मात्र ही क्रांती वाटते तितकी सोपी नाही. या आगीत उडी दादांना घ्यायचं ती त्यांनी घ्यावी मात्र गेल्या 20 वर्ष तुमच्या शब्दावर काम करणाऱ्या , तुम्हाला मतदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आग्रह पक्षांतराचा असेल तर त्याकडे किमान लक्ष तरी द्यावे. ज्या कार्यकर्त्यांनी अनेकांचे विरोध पत्करुन तुमच्यासाठी शिवसंग्रामचा झेंडा उचलला किंवा गपचुपका असेना तुम्हाला मतदान केले असेल त्यांना, त्यांच्या मागणीला तुम्ही न्याय देताय ना ? याकडे लक्ष द्यावे अन्यथा तुमच्या मनमानी निर्णयाने कार्यकर्ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. तालुक्यातील जनतेकडून होणारा पक्षांतराचा आग्रह पायदळी तुडवणे म्हणजे त्यांच्या भावनांना तुडवण्यासारखेच आहे. इतर राजकारणी अन तुमच्यात भविष्यात कुठलाही फरक राहणार नाही. आजपर्यंत तुम्हाला बदनाम केले की तुम्ही मॅनेज होता मात्र या निवडणुकीत लोकांनी बघितले कोण मॅनेज झाले अन कोण लढले ही निवडणूक तुमच्यावरील डाग पुसणारी ठरली. जी माणसे मॅनेज होता ती जाहीर सभेत विरोधकांची कपडे कधीही फाडत नाहीत हे सुज्ञ मतदार जाणून आहेत. यामुळे आपण स्वतःवर असलेला डाग पुसून राजकारणापासून दूर जाणे म्हणजे एक प्रकारे कार्यकर्त्यांचा विश्वासघात ठरेल. यामुळे आपला निर्णय तालुक्याला कलाटणी देणारा ठरावा ही जनतेची अपेक्षा आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादी नेते कितीही म्हणत असले आम्ही खूप लढलो नगरपंचायतला मात्र हे धादांत खोट आहे, राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत केली आहे, भाजपाचा विजय सोपा होण्यात भाजपाचे विकासात्मक धोरण आणि कार्यकर्त्यांचे जाळे हे असले तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतील बेबनाव खचलेले नेते, पराभवाच्या मानसिकतेत असलेले नेते अन कार्यकर्ते हे देखील भाजपच्या विजयात वाटेकरी आहेत. तालुक्यात उदयकुमार राष्ट्रवादी प्रवेश करून स्वगृही परतलेले तर राजकारण पूर्ण बदलणार आहे. कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर बळ मिळणार व ते जोमाने कामाला लागतील. उदयकुमारांना कोणी स्थानिक नेता विरोध करेल अस पण चित्र नाही. कारण योगेश आबांशी असलेले उत्तम संबंध, दुसरे नेते गोटुआबा हे दादांचे बोट धरून राजकारणात आलेत यामुळे त्यांचाही विरोध नसेल. सर्व गट एकत्रित येऊन चांदवड – देवळा मतदार संघात राष्ट्रवादीला सुगीचे दिवस येतील हे ही तितकेच खरे.
आग्रह कार्यकर्त्यांचा आहे मात्र, निर्णय दादांच्या कोर्टात आहे बघूया आता कार्यकर्त्यांचा मान राखला जातोय की स्वतःचे धडे गिरवत प्रवाह विरुद्ध पुन्हा भूमिका घेतली जातेय हे येणारा काळच सांगेन.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम