अहिराणी बोलीभाषेचा अभिमान बाळगवा : अ‍ॅड. मुंजवाडकर

0
15

नाशिक : शब्दरत्नांचा आविष्कार जोपासताना अहिराणी बोलीभाषेचा अभिमान बाळगून साहित्यिकांनी शब्दांवर प्रेम करावे, असे आवाहन साहित्यायन संस्थेचे सचिव आणि गीतकार अ‍ॅड. सोमदत्त मुंजवाडकर यांनी केले.

सटाणा येथे नेहरू युवा केंद्र आणि साहित्यायन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य शिबीर आणि काव्य संमेलन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अ‍ॅड. मुंजवाडकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते तथा ज्येष्ठ साहित्यिक अजय बिरारी, कवी देवदत्त बोरसे, शैलेश चव्हाण, विवेक पाटील, काशिनाथ डोईफोडे, आबा आहेर, प्रा. शं. क. कापडणीस आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. मुंजवाडकर यांनी शब्दांना भाषा, जात, पंथ, प्रांत आणि धर्म यापलीकडे नेण्याची किमया साहित्यिकांनी केल्यास अहिराणी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला. अजय बिरारी यांच्या ‘प्रेम आणि क्रिकेट’ ही अहिराणी भाषेतील विनोदी कविता आणि गझलेने काव्य मैफलीची सुरुवात झाली.

कवी बोरसे यांनी जो दुसऱ्याला घडवितो तोच मोठा होतो आणि त्यामुळे साहित्य चळवळ अखंडित राहते असे सांगून ‘जी सागराला जाऊन भिडते, ती सरिता आणि जी हृदय सागराला जाऊन मिळते ती कविता’ तसेच ‘नदारी दुनियाले’ ही गझल सादर केली. मुंजवाडकर यांनी बहारदार चारोळी आणि ‘सोबतीचा दिवा’ तसेच ‘आटल्या सागरात’ ही गीतरचना तर कवी समाधान भामरे यांनी ‘कुणी पोर देता का पोर’ आणि ‘जत’ ही अहिराणी कविता सादर केली. विवेक पाटील यांनी ‘कसमादे पट्टा एक नंबरी’, शैलेश चव्हाण यांनी ‘काळीज जळताना’, ‘नंदाळ’ आणि ‘झिंगी’ या ग्रामीण ढंगातील काव्यरचना, प्रा. कापडणीस यांनी ‘अमृत महोत्सव’, कवयित्री माधुरी अमृतकार यांनी ‘आणीबाणी व भाऊबंदकी’, सुरेखा पाटकरी यांनी ‘चंद्र आणि डोंगर’, पूनम अंधारे, रोहिणी गायकवाड तसेच अनेक कवयित्रींनी विविध विषयांवरील उत्कृष्ट काव्यरचना सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली.

आबा आहेर, दादा खरे यांनी ‘करू नका घाण’, कैलास चौधरी यांचे ‘गेले कुठे सीताराम’ तर नाशिक येथील कवी माणिकराव गोडसे यांच्या करोनावरील काव्यरचनेने सर्वाना मंत्रमुग्ध केले. यावेळी बाळासाहेब गिरी, काशिनाथ डोईफोडे, सोपान खैरनार, सौरभ आहेर, नरेंद्र सोनवणे, अमित शेवाळे, यश सोनार, ए. एस. भामरे आदींसह जिल्ह्यातून आलेल्या कवींनी त्यांच्या रचना सादर केल्या. सटाणा तालुक्यातील ब्राह्मणपाडे येथील युवाशक्ती फाऊंडेशन यांनी संमेलनास सहकार्य केले. यावेळी करंजाड गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश वाघ, समाधान भामरे, अभीर जाधव, सचिन लिंगायत, पंकज पंडित आदींसह साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कवी धनंजय अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. कवी समाधान भामरे यांनी आभार मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here