द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : जागतिक तापमानवाढीवरील (Global Warming) अनेक तज्ञ जागतिक नेत्यांना तापमानात होणारी वाढ थांबवण्याचे आवाहन करीत आहेत. तज्ज्ञांनी नेत्यांना ग्लोबल वॉर्मिंग १.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत रोखण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. पुढील पाच वर्षांत जगाचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता पन्नास टक्के असल्याचे ब्रिटनच्या संशोधकांनी म्हटले आहे. हे तात्पुरते असू शकते. परंतु, तापमानात वाढ होणे हे चांगले लक्षण नाही, असे सांगण्यात आले आहे.
वार्षिक १.५ डिग्री सेल्सिअसच्या जागतिक तापमानवाढ मर्यादेचे उल्लंघन केले जाऊ शकते. २०२२ ते २०२६ या काळात विक्रमी उष्णता असेल, असे संशोधकांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी प्रथम पॅरिस हवामान करारावर नेत्यांनी स्वाक्षरी केली आणि नंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लासगो येथे COP26 मध्ये जगाने आपल्या ध्येयासाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, असे अहवाल सूचित करतात.
अभ्यासात असे म्हटले आहे की, २०२२ ते २०२६ पर्यंत जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीच्या तुलनेत १.१°C आणि १.७ °C दरम्यान असू शकते. या कालावधीत एका वर्षात १.५ अंश सेल्सिअस पातळी (Global Warming) तोडण्याची शक्यता ४८ टक्के किंवा सुमारे पन्नास टक्के आहे, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
कार्बन डायऑक्साइडची वाढती पातळी
वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची (carbon dioxide) पातळी हळूहळू वाढत आहे. पॅरिस करारात ठरवलेल्या या पहिल्या उंबरठ्यावर आपण जगाचे तापमान वाढताना पाहत आहोत. आपण जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिले पाहिजे, असे यूके मेट ऑफिसमधील संशोधक डॉ. लिओन हर्मनसन यांनी म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम