Skip to content

‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ आजच्याच दिवशी जगाला भारताची ताकद दिसली होती ; जाणून घ्या ह्यामागील इतिहास


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : भारतात ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात किती प्रगती केली आहे आणि आतापर्यंत कोणकोणती मोठी कामगिरी केली आहे हे लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. तसेच, या दिवसाशी संबंधित एक मोठी घटना देखील आहे ज्यामुळे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ११ मे या दिवशीच साजरा केला जातो.

११ मे १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती. भारताने १९७४ ला पहिली अणू चाचणी केली होती. त्यानंतर अण्वस्त्र संबंधितचे तंत्रज्ञान सिद्ध करण्यासाठी काही चाचण्यांची आवशक्यता होती. विविध आंतरराष्ट्रीय आणि राजकीय कारणांनी १९७४ नंतर चाचण्या शक्य झाल्या नाहीत. पण १९९८ ला पाच यशस्वी अणू चाचण्या करत भारताने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवून दिली. पोखरणमधील या अणुचाचणीचे नेतृत्व माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. यानंतर, पुढच्या वर्षी याच दिवशी म्हणजेच ११ मे १९९९ रोजी भारतात पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

तसेच, याच दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याने या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढते. त्रिशूल हे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे आपल्या लक्ष्यावर वेगाने मारा करते. याशिवाय या दिवशी भारताचे पहिले विमान हंसा-3 ने उड्डाण केले. नॅशनल एरोस्पेस लॅबने ते तयार केले आहे. हे दोन आसनी हलके विमान आहे, जे पायलट प्रशिक्षण, हवाई छायाचित्रण आणि पर्यावरणीय प्रकल्पांसाठी वापरले जाते.

तत्कालीन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या योगदानाचे स्मरण करून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय दरवर्षी ११ मे रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी दरवर्षी एक थीमही ठरवली जाते. याशिवाय तंत्रज्ञान संस्था आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!