Skip to content

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; मात्र AIMIM चे इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप


द पॉईंट नाऊ ब्युरो : सध्या राज ठाकरे यांच्या मशीद आणि भोंगे या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात देखील वातावरण तापलेले आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे सभा घेऊन राज्य शासनाला इशारा दिला. राज ठाकरे यांच्या विविध वक्तव्याचा दाखला देत त्यांच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत, म्हणून त्यांच्यावर सौम्य गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप AIMIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा, हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ वर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांच्यावर विविध कलमे दाखल करत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. आता राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आलेलीच कलमे राज ठाकरेंवर दाखल करावीत अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सभेनंतर AIMIM चे इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर टीका करत, आम्हाला देखील जीभ आहे, असे म्हणत इशारा दिला होता. आता त्यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोप केल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमची आज शेवटची मुदत होती. यामुळे उद्या महाराष्ट्रात काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!