देवळा : देवळा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने सोमवारी( दि.०९) रोजी येथील कोलती नदीच्या परिसरात पुनीत सागर अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी नदी पात्रातील प्लास्टिक कचरा हा गोळा केला.यावेळी लेफ्टनंट बादल लाड यांनी सांगितले की ,पुनीत सागर भारत सरकार व एनसीसी निदेशालय यांच्यातर्फे हा उपक्रम चालवण्यात येत आहे. या अभियानामध्ये समुद्र, नदी, तलाव, धरणे, पाण्याचे जलस्रोत आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम व प्लास्टिक गोळा करणे अशा प्रकारचे राष्ट्रव्यापी प्रमुख अभियान राबविण्यात येत आहे.
७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी नाशिकचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अलोक कुमार सिंग व प्रशासकीय अधिकारी कर्नल राकेश कौल यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार हा कार्यक्रम संपूर्ण नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे .यामध्ये प्रत्येक तालुक्यातील जलसाठे व नदी,धरणे, तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान एक भाग म्हणून पुनीत सागर अभियान २०२२ मुंबई “बी” ग्रुप,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय छात्र सेना डायरेक्टर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यात राबवले जात आहे. यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील किनारपट्टीची स्वच्छता करण्यात आलेली आहे.
यात राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहभागी छात्रानी देवळा शहरांमध्ये प्रभातफेरी काढून प्लास्टिकचा वापर टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, यासारख्या घोषणा देऊन जलसाठा संवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. मालती आहेर ,प्राचार्य हितेंद्र आहेर,उपप्राचार्य विजयकुमार जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले . राष्ट्रीय छात्र सेनेच्या अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम