जळगाव प्रतिनीधी : राज्यात राजकीय भूकंप घडत सत्तांतर घडले इतिहासात सर्वात मोठी बंडखोरी शिवसेनेत घडली त्यात जळगाव जिल्ह्याचा देखील सक्रिय सहभाग होता. पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी निष्ठेला तिलांजली देत उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत शिंदे गटात सहभागी झाले. मात्र या सर्व प्रकाराने व्यथित झालेल्या त्यांच्या बहीण वैशाली पाटील – सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावत राजकीय सक्रियतेचे सूतोवाच केले आहेत. यामुळे बहिणीने भावाला निष्ठेची शिकवण दिल्याची चर्चा आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांना आता कट्टर शिवसैनिकांचा सामना वेळोवेळी करावा लागतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. हा वाढदिवस फारच लक्षवेधी ठरत आहे, या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत शिवसैनिकांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात सर्वत्र आज हे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातही अशीच स्थिती आहे. इथे तर आमदार किशोर पाटील यांच्या बहिणीने उद्धव ठाकरेंना समर्थन दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बंडखोरी करत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले असून त्यांचा हा निर्णय कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांना कदाचित मान्य नाही, त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणारे बॅनर पाचोरा शहरात ठिकठिकाणी लावले आहे. यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देत राजकीय सक्रियेतेचे सूतोवाच केले.
वैशाली पाटील सूर्यवंशी या कट्टर शिवसैनिक स्वर्गीय माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आहेत. आर. ओ. पाटील हे किशोर पाटील यांचे काका असून आर. ओ. पाटील यांच्यामुळेच किशोर पाटील राजकारणात आले व आमदार होवून आज या पदापर्यंत पोहचलेत. शिवसेनेत असताना आमदार झाले. काही दिवसांपूर्वीच बंडखोरी करत किशोर पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. आप्पांचा हा निर्णय शिवसैनिकांना पटला नाही सैनिकांनी रोष व्यक्त केला तर काहींनी निषेध नोंदवला, तर दुसरीकडे आता त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी यांनीही किशोर पाटील यांना पाठिंबा न दर्शवता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दिलं यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या वैशाली सूर्यवंशी यांचे आज अचानक उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा फलक झळकल्याने खळबळ उडाली आहे. भाऊ शिंदे गटात बहीण उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ राजकारणाच्या या मैदानात उतरल्याने चर्चाना उधाण आल आहे.
वैशाली पाटील नेमक आता काय करताय ?
त्या स्व. आर ओ पाटील यांची कन्या आहेत तात्या यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख आहे. निर्मल सीड्स नावाने असलेला उद्योग हा वैशाली सूर्यवंशी मोठ्या जबाबदारीने सांभाळतात. आरो पाटील यांच्यानंतर त्यांच्या कन्या वैशाली पाटील या राजकारणात सक्रिय झाल्याने आगामी काळात निवडणुकांमध्ये तरुण चेहरा म्हणून त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे भाऊ किशोर पाटील यांच्या विरोधात त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी असा सामना आगामी काळात रंगणार असल्याची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम