नाशिक – शहरात एका वृध्दाने गोदावरी नदीपात्राला आलेल्या पुराच्या पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र, ही घटना कळताच जीवरक्षकाने लगेच पाण्यात उडी मारून वृद्धाचा जीव वाचवला आहे.
गोपीनाथ कोंडाजी त्रिभुवन(६५) असे या वृध्दाचे नाव असून ते सोमवारी सकाळी गोदावरीतील दुतोंड्या मारूतीजवळ आलेल्या पुराच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्ते. मात्र, वेळीच जीवरक्षकाने पाण्यात उडी मारल्याने त्यांचा जीव वाचवला आहे. दरम्यान, त्यांनी मुलगा व सूनेच्या जाचाला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.
मूळचे वैजापुरचे रहिवासी असलेले गोपीनाथ त्रिभुवन सध्या सिडकोतील लेखानगर येथे राहत आहेत. मुलगा व सुनेकडून सतत आपला मानसिक छळ होत असल्याने ते त्रासले होते व त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, त्यासाठी ते सकाळी रामकुंड परिसरात आले. यावेळी मुसळधार पावसामुळे सध्या गोदावरी दुथडी भरून वाहत होती व त्यांनी दुतोंड्या मारुतीजवळ उडी घेतली.
नेमके त्याचवेळी तेथील जीवरक्षक दीपक कुरणे यांना हा प्रकार लक्षात आला. व त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पुरात उडी घेतली आणि रामसेतू पुलाजवळील नदीपात्रातून त्रिभुवन यांना बाहेर काढले. नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्रिभुवन यांची रीतसर तक्रार घेतली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम