Skip to content

खासदार श्रीकांत शिंदेंच सूचक असं वक्तव्य, मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का बसणार?


द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : काही आमदार व खासदार हे देखील आमच्या संपर्कात असून पुढील येणाऱ्या काळात कोण कुठे जाणार, कोण कुणाच्या संपर्कात असणार हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदेनी केलाय. तसेच मध्यावधी निवडणुकासाठी केलेलं वक्तव्य हे म्हणजे उरलेले आमदार कुठेही जाऊ नये याकरिता सुरू असलेला प्रयत्न आहे अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे हे डोंबिवली मधील काटई गावात तुलसी विवाहा करिता आले होते. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होत. याबद्दल श्रीकांत शिंदे यांना विचारले असता महाराष्ट्राला सध्या स्थिर सरकार मिळाले आहे. त्यामध्ये उरलेले आमदार कुठेही जाऊ नये म्हणून मध्यवधी निवडणुकांचं वक्तव्य केलं जातं असून हा निव्वळ टाइमपास आहे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच ही वक्तव्य पूर्ण प्लॅनिंग नुसार केली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

सध्याचे सरकार गेल्या तीन महिन्यात ज्या प्रमाणे लोकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे पाहता दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची परिस्थिती काय होईल? याचा विचार आल्याने यांना भीती वाटतं आहे आणि त्यामुळेच मध्यावधी निवडणुकांचं वक्तव्य केलं जातं असल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. तसेच सर्व आमदार , खासदार आमच्या संपर्कात असून पुढील येणाऱ्या काळात कोण कुठे जाणार आणि कोण कोणाच्या संपर्कात असणार हे लवकरच कळेल, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केलेलं हे वक्तव्य येत्या काळात राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!