मुंबई : काल मंगळवारी सुप्रीम कोर्टाने शिवसेना कोणाची व निवडणूक चिन्हासंबंधीचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर आता राज्याच्या सत्तासंघर्षाचा पुढचा अंक शनिवारी १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या. एम.आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी.एस. नरसिंहा या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या खंडपीठापुढे काल निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भातील याचिकेवर तब्बल सहा तास चाललेल्या सुनावणीनंतर आता अन्य याचिकांवरील पुढील सुनावणी येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या याचिकांमध्ये शिंदे गटाची अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचा अपात्रतेच्या कारवाईचा मुद्दा व अश्या विविध याचिकांचा समावेश आहे. ह्या सर्व याचिका १ नोव्हेंबरपासून सुरु केल्या जातील. कारण, या महिन्यात येणाऱ्या नवरात्र आणि दिवाळीच्या सुट्ट्या पाहता सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर सुनावणी घेत त्वरित सर्व याचिका निकाली काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरातच या सर्व याचिकांवरील सुनावण्या पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काल झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांच्या, तसेच राज्यपाल व निवडणूक आयोगाच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हांवर कार्यवाही करण्याची निवडणूक आयोगावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर १ तारखेपासून नियमित सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल व अभिषेक मनू सिंघवी, तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी सुप्रीम कोर्टात आपापल्या बाजू मांडत आहेत. दरम्यान, राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम