मुंबई : येत्या ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर वांद्रे येथील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठीची जोरदार तयारी सुरु आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन केले जात आहे. त्यांच्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आता या मेळाव्याला कोण संबोधणार यावर शिक्कामोर्तब झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मुख्य नेते म्हणून ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसरकर यांनी दिली आहे.
शिवसेनेतील बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून दोन्ही गटाकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला जात आहे. पण एकनाथ शिंदेनी एवढ्या मोठ्या बंडानंतरही उद्धव ठाकरेंकडे असलेले शिवसेना पक्षप्रमुखपद घेण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदे गटाने मुख्य नेतेपदाची निर्मिती करत ते पद शिंदेंना देण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसरकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शिंदेगटाने एकनाथ शिंदे यांची गटाच्या मुख्य नेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाइतकाच दर्जा हा मुख्य नेतेपदासाठी आहे. तसेच न्यालालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्येही एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मुख्य नेते असा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भरकटत बाळासाहेबांचे विचार सोडत वेगळेच वळण घेतले आहे. त्या तुलनेत बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा हा या निमित्ताने कार्यकर्त्यांना बीकेसीच्या मेळाव्यात ऐकायला मिळतील, असाही चिमटा त्यांनी काढला आहे. शिवसेनाप्रमुख पद घेण्यास नकार देत उद्धव ठाकरेंनी जसे पक्षप्रमुख पद स्विकारले, तसे आमच्या गटाने हे मुख्य नेतेपद स्वीकारले आहे. पण मुख्य नेतेपद देखील तितक्याच दर्जाचे पद असल्याचे पावसकर यांनी यावेळी सांगितले.
पावसरकर यांनी ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले, की ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी किती गर्दी होईल याबाबतची शंका ठाकरेंना होती. त्यामुळे त्यांनी गटप्रमुखांची रंगीत तालिम त्यांनी घेतली. खरा इव्हेंट तर त्यांनी मांडलाय, ज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची थट्टा मांडली जात आहे. पण बीकेसीत होणाऱ्या आमच्या दसरा मेळाव्यात एक राजकीय चमत्कारच पहायला मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम