Skip to content

शेतकऱ्यांचा घरात ‘शिमगा’, मस्तवाल भान हरपलेल्या नेत्यांची मात्र राजकिय धुळवड अन् ‘दिवाळी’


अंकुश सोनवणे | द पॉइंट नाऊ

देशात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. सतत होणारी अवकाळी, नापिकी, पडलेले बाजार भाव यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. भविष्यात शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या घरात शिमगा सुरू तर दुसऱ्या बाजूला गलिच्छ राजकारण सुरु आहे, राज्यकर्ते भान हरपून दीपोत्सव साजरा करताय हे चित्र महाराष्ट्राला नक्कीच शोभेचे नाही.

तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे विठेवाडी येथील शेतकरी दादाजी सोनवणे यांच्या कांदा लागवड केलेल्या शेतात पाणी साचल्याने वाहून गेले कांदा पीक (छाया – सोमनाथ जगताप )

दोन दिवसापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा निराशा दिली आहे. हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शेतकऱ्याने खूप कष्ट करून आपले पीक उभे केले होते. स्वतःच्या पोटाला टाचा दिला असेल मात्र पिकाची काळजी घेतली, आपल्या लेकराप्रमाणे पीक वाढवले अन् काही क्षणात होत्याचं नव्हत या पाऊसाने केलं. शेतकऱ्याने मदतीसाठी जायचे कुणाकडे कारण महाराष्ट्र आज आपल्या पोशिंद्याला विसरला की काय असे चित्र आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे, यावर चर्चा होते मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा का होत नाही हे देखील बघितले पाहिजे.

असंवेदनशील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढे आलेले दिसत नाही साधी चर्चा देखील होताना दिसत नाही, सरकारी तोकडी मदत होईलही मात्र ती अटी शर्थिंच्या नादात शेतकऱ्यांना अगदी पिळवटून घेत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे हा प्रश्न पडला आहे. कर्जबाजारी पणामुळे शेतकरी आत्महत्या पुन्हा प्रचंड वाढल्या आहेत. ही परिस्थीती देशाला आर्थिक खाईत लोटनारी ठरणार आहे. शेतकऱ्यांना आज पावसाळ्यात देखील लाईट ही रात्रीची मिळत असते दिवसा शेतकऱ्यांना लाईट देखील नाही. कांदा , कापूस, सोयाबीन, टोमॅटो, कोबी यासारखे पीक जमीनदोस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी पावसामुळे तर काही ठिकाणी रोग उद्भवल्याने पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. शेतकरी पूर्णतः उद्धवस्त होत असताना राजकीय पुढारी राजकीय चिखलफेक करण्यात पूर्णतः व्यस्त आहे.

शेतकरी चिखलात पूर्णतः लोळला गेलाय भुईसपाट झाला तर राजकीय पुढारी उनी धूनी काढण्यात गटार गंगेत नाहून निघाले आहेत. नोकरदारांची दिवाळी गोड होणार पुढाऱ्यांची दिवाळी गोड होणार मात्र ज्यांच्यामुळे माणूस जगतोय त्यांची दिवाळी मात्र कडू होणारे याकडे लक्ष का दिले जात नाही, याकडे बघणे महत्वाचे आहे. निवडणुका आल्यात की आश्वासनांची खैरात दिली जाते मात्र , निवडणुकीपूर्ता शेतकरी मर्यादित राहील त्याचा वापर मतदानासाठीच केला जाईल का ? खर म्हणजे शेतकऱ्यांना या तोडक्या सरकारी भिकेची अजिबात अपेक्षा नाही त्याला फक्त त्याच्या घामाचे दाम द्यायला हवं बाजार भाव दिला तर शेतकरीच सरकारला आर्थिक मदत करेल इतका दानशूर शेतकरी आहे. याकडे सरकारने लक्ष दिले तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळेल.

देवळा तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विठेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडिराव निकम यांनी केली आहे. तालुक्यात बुधवार (दि १९ )रोजी रात्री मुसळधार पाऊस झाला . या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी विशेषतः भऊर, विठेवाडी , वार्षी, हनुमंतपाडा, कनकापूर, शेरी या परिसरात अतिवृष्टी झाली असून, शेतात पाणी साचल्याने लागवड केलेल्या लाल रांगडा कांदा वाहून गेला आहे . त्याच प्रमाणे द्राक्ष , डाळिंब , कोबी , सोयाबीन , मका आदी हातातोंडाशी आलेल्या पिके खराब झाली आहेत.

महागडे कांदा बियाणे वाया गेले तसेच पिकांना महागडे औषधे वापरून फायदा झाला नसून ,शासनाने सरसकट पंचनामे करावेत व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यात उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत बनला आहे . एकीकडे शेती मालाला काडीमोड भाव त्यात पिकांना सततच्या बदलत्या वातावरणचा बसत असलेला फटका आणि अतिवृष्टी मुळे शेतात साचलेले पाणी यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा धास्तावला असून , शासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी . येन दिवाळीच्या तोंडावर पावसाने कहर केल्याने याचा बाजारपेठेवर देखील परिणाम झाला असून, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे दिवाळी सण कसा साजरा करावा असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे . सम्पूर्ण शेती व्यवसाय अतिवृष्टीमुळे नेस्तनाबूत झाल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढावले आहे . यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी ,अशी मागणी शेवटी विठेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व प्रगतिशील शेतकरी पंडितराव निकम यांनी केली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!