Skip to content

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा


मुंबई : ज्याप्रकारे विरोधकांनी शिवसेनेत फुट पाडली, त्याचप्रकारचा डाव पवार कुटुंबात फूट पाडून राष्ट्रवादी फोडण्याचा विरोधकांनी केला आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. ते मुलाखतीत म्हणाले, ज्याप्रकारे विरोधकांनी शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारेच पवार कुटुंबातही फूट पाडून राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच शिवसेनेनंतर आम्हालाही लक्ष्य केले जाऊ शकते अशी शक्यताही रोहित यांनी व्यक्त केली आहे. पण, आमच्या कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचे उद्दिष्ट स्पष्ट असल्याचेही रोहित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच रोहित व अजित पवार यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्यात. यासंदर्भात त्यांना मुलाखतीत विचारले असता, ते म्हणाले की, अजित पवार यांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचे तिकीट दिले. माझे लग्नही त्यांनीच ठरवले होते. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्हाला मोठे व्हायचे असते, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही.

पुढे ते म्हणाले, आमची सर्वांचे उद्दिष्ट स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण विरोधकांना ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असे विरोधकांना वाटत आहे. शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो, असे ते यावेळी म्हणाले.

अजित पवारांची यावर प्रतिक्रिया

दरम्यान, रोहित यांच्या या मुलाखतीतील वक्तव्यावर मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, की या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे, ते मी रोहितला विचारतो. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच, अलीकडच्या काळात वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मला काही दिवसांपूर्वी किती दिवस सरकार टिकणार असा प्रश्न विचारला होता, त्यावर १४५ चा आकडा आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल असे सांगितले होते. पण मी काहीतरी वेगळे बोलल्याचे तेव्हा सांगण्यात आले. मला काय करायचे, मला खूप काम आहे. त्यांचे त्यांना लखलाभ लाभो आणि आमचे आम्हाला, असेही अजित पवार म्हणाले.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!