दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आले आहेत. त्यादरम्यान, त्यांचा एका सभेतील व्हिडियो सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेनिमित्त देशभरात पदयात्रा करत असून, त्यांची ही यात्रा सध्या कर्नाटकात पोहोचली आहे. दरम्यान ते काल म्हैसूर येथील जाहीर सभेत जनतेशी संवाद साधत असताना मुसळधार पाऊस पडला होता. मात्र, राहुल यांनी आपले भाषण सुरुच ठेवले होते. त्यांचा हा व्हिडियो कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. दरम्यान, त्यांचा हा व्हिडियो व्हायरल होताच अनेकांनी शरद पवार यांच्या ‘त्या’ सभेची आठवण काढली आहे.
कॉंग्रेसने राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत “निमित्त नाही, फक्त आवड” असे कॅप्शन देत लिहिले, की भारत जोडो यात्रेतून त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांचा या व्हिडियोला सोशल मीडियावर असंख्य लाईक्स मिळत असून हा व्हिडियो जोरदार व्हायरल होत आहे.
No excuses. Only passion.
There is no hurdle big enough to stop #BharatJodoYatra from achieving its goal. pic.twitter.com/puKgKeVZ1E
— Congress (@INCIndia) October 2, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये सातारा येथे भरपावसात केलेले तुफान भाषण आजही सर्वांच्या लक्षात आहेत. त्यावेळी पार पडलेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात भरपावसात जोरदार भाषण केले होते. त्यांचा हा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल होताच राज्यासह देशभरात हा चर्चेचा विषय ठरला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल कर्नाटकातील म्हैसूर येथे राहुल गांधींच्या सभेत पाहायला मिळाली होती.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू आहे. कन्याकुमारीतून काश्मीरपर्यंत तब्बल १५० दिवसांची ही पदयात्रा सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेद्वारे राहुल गांधी हे देशभरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच, महागाई, बेरोजगारी, जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता व सध्याची परिस्थिती यांसारख्या अनेक मुद्द्यांवर ते जनतेचे लक्ष वेधणार आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम