Pankaja Munde | आज विजयादशमीच्या निमित्ताने बीडमध्ये दोन दसरा मेळावे आयोजित करण्यात आले असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे, तर दुसरीकडे नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगाव येथे पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे पहिल्यांदाच एका मंचावर येणार असून याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. तर मनोज जरांगे पाटलांचा हा पहिला दसरा मेळावा असून मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्यांकडे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्यांमध्ये दोन्ही नेते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला लागली असून पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटीलयांच्या बद्दल केलेल्या विधानाने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जरांगेंच्या मेळाव्याबाबत काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपस्थित राहणार असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून त्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. “या मेळाव्यात सर्वच जातीचे लोक येत आहेत, त्यामुळे वेगळं काही नाही.” असे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. मीडियाशी साधलेल्या संवादात भाजप नेता पंकजा मुंडे यांना मनोज जरांगे यांच्या मेळाव्याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यावर त्यांनी आता प्रतिक्रिया देत, “मी भाषणात काय बोलेण हे आत्ताच सांगता येणार नाही. भाषणातच सर्व परिस्थितीवर बोलणार आहे. त्यात नारायण गडावर आज एक मेळावा होत आहे. आमचा मेळावा तर दरवर्षी होतो. पण नारायण गडावर आज मेळावा होतोय. हे खरं वैशिष्ट्य आहे त्यामुळे, जरांगे पाटील हे नारायण गडावरच्या मेळाव्याला येणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार हे ऐकायचे आहे. जरांगे यांचा मेळावा पारंपारिक नाही, आमचा मेळावा पारंपारिक आहे. तेव्हा त्यांच्या मेळाव्याशी आमचा काही संबंध नाही.” असे त्या यावेळी म्हणाल्या.
धनंजय मुंडे बरोबर व्यासपीठावर एकत्र येण्याबाबत काय म्हणाल्या?
त्याचबरोबर, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच दुसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. त्यावर भाष्य करत त्यांनी, “आम्ही बारा वर्षानंतर एकत्र येत आहोत. हे वैशिष्ट्य नाही की परंपरा आहे. आमच्यासाठी आम्हाला भगवान बाबा महत्त्वाचे आहेत. आम्ही कधी एकत्र मेळावा केला नाही, गोपीनाथ मुंडे असताना देखील आम्ही खाली बसून भाषण ऐकायचो. परंतु आम्ही मेळाव्याच्या निमित्ताने काही एकत्र आलो नाही. आता पण आम्ही मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलो नाही. आता आम्ही गेल्या काही वर्षांपासून एकत्र एकाच मंचावर येऊन भाषण देत आहोत. त्यामुळे एका मंचावर एकत्र येण्याची आम्हाला सवय झाली आहे.” अस म्हणत स्पष्ट केले.
ओबीसी मराठा संघर्ष और बोलणार नाही
आमचा मेळावा पारंपारिक असून त्यात ओबीसी मराठा संघर्षावर बोलणार नसल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले असून “ओबीसी मराठा-संघर्ष असा रंग माझ्या मेळाव्याला नसेल दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच माझा मेळावा येत असतो. मात्र हे काही राजकीय व्यासपीठ नव्हे. मात्र माझ्या भाषणातून सामाजिक राजकीय संदेश दिला जाईल” असे त्यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम