नाशिक – नाशिक महानगरपालिकेने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या २० व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
बंदी घातलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेकडून सर्व सहा विभागांमध्ये कडक मोहीम सुरु आहे. त्यासाठी मनपा प्रशासनाने प्रत्येक सहा विभागात तीन पथके तयार केली आहे. ही पथके शहरातील विविध व्यापारी संस्थेवर अचानक छापे टाकून बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा जप्त करत आहे. त्यानुसार गेल्या नऊ दिवसांत, सदर पथकांनी आतापर्यंत सुमारे २० व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, या व्यापाऱ्यांकडून बंदी असलेले ४५ किलोचे प्लॅस्टिक जप्त केले आहे.
पर्यावरण मंत्रालयाने गेल्या १ जुलैपासून देशात सिंगल युज प्लॅस्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, तिचे आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्याचे पालन करत महापालिकेने शहरात ७५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या प्लॅस्टिकच्या वापरावर कारवाई करत आहे. यापूर्वीच सप्टेंबर २०२१ पासून शहरात सिंगल युज प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे.
यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच महापालिकेने सिंगल युज प्लॅस्टिक वापराविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. यासाठी मनपा प्रशासन लोकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच शहरात बंदी घातलेले सिंगल युज प्लॅस्टिक तयार होत नाही किंवा ते वापरले जात नाही, याची खात्री करण्यासाठी ते व्यापारी संस्थांवर अचानक भेटीदेखील घेत आहेत.
तसेच, गेल्या दोन महिन्यांत आम्ही ७७ व्यापाऱ्यांना दंड ठोठावला असून त्यांच्याकडून ४०६ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले आहे. तसेच, आम्ही या व्यापाऱ्यांकडून एकूण ३.९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम