सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तणनाशक फवारणीमुळे कांद्याचे नुकसान होण्याचे सत्र चालूच असून विठेवाडी पाठोपाठ मेशीसह परिसरात लागवड केलेल्या उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यानंतर शंभर एकर पेक्षा जास्त कांद्याचे संपूर्ण नुकसान झाले असून सदर नुकसानीची चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. राहुल आहेर यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधित कंपनीचे अधिकारी व कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याविषयी निर्देश दिले आहेत.
Deola | नेमकं प्रकरण काय..?
मेशी येथे शेतकऱ्यांनी इंडियन पेस्टीसाईड लिमिटेड कंपनीचे क्लोगोल्ड नावाचे तणनाशक कांदा पिकावर फवारल्याने जवळपास शंभर एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील कांदा पीक नष्ट झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आधीच मजुरीचे वाढलेले दर, महागडी रासायनिक खते, पहिल्यांदा टाकलेली कांद्याची रोपे खराब होऊन त्यानंतर दुसऱ्यांदा जास्तीचे दर देऊन कांदा बियाणे खरेदी करून नव्याने रोपे तयार केली.
अतिवृष्टिने आधीच खरिपाची पिके वाया गेली मागील वर्षी दुष्काळामुळे हाती काहीच आले नाही. अशा अनेक संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात कांदा लागवड केली होती. मात्र कंपनीच्या सदोष औषधामुळे शेतकरी मात्र पुर्णतः उध्वस्त झाला असून याबाबत शेतकऱ्यांनी आ. डॉ. राहुल आहेर यांची भेट घेत झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले असता आमदार आहेर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पुढील कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
Deola | आ. राहुल आहेरांनी दिंडीतील भाविकांसोबत घेतला जेवणाचा आस्वाद
पीकांची डोळ्यासमोर राख रांगोळी झालेली पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर
काबाड कष्ट करून लावलेल्या कांद्याची आपल्या डोळ्यासमोर राख रांगोळी झालेली पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले आहेत. हातीपदरी असलेलं भाग भांडवल सर्व खर्च झाल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. उध्वस्त झालेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर फिरविले असुन शेतकरी आसमानी बरोबरच सुलतानी संकटात सापडला असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी भिला आहेर, प्रविण शिरसाठ, बापु आहेर, कैलास खैरणार, शशिकांत शिरसाठ, सारिका पाटील, भगवान शिरसाठ, शरद शिरसाठ, निवृत्ती चव्हाण, दत्तु शिरसाठ, विलास बोरसे, माणिक बोरसे, संदिप शिरसाठ सह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम