Nashik News | विधानसभा 2024 साठी काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी राज्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी नागरिकांनी राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला असून नाशकातही चांगला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाले. जिल्ह्यामध्ये एकूण 60 टक्के मतदान झाले आहे. असे असले तरीही 6 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या अनेक नागरिकांची नावे विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून गायब असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागल्यामुळे नागरिकांकडून निवडणूक आयोगाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
मतदार यादीतून बऱ्याच नागरिकांची नावे गायब
काल जिल्ह्यातील 15 जागांसाठी मतदान पार पडले असून यावेळी मतदारांचा उत्साह देखील वाखडण्याजोगा होता. परंतु नेहमीप्रमाणेच यंदा देखील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर गेल्यानंतर बीएलओ बूथ किंवा राजकीय पक्षाच्या बूथ वर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यादरम्यान काही जणांची नावे यादीतून डिलीट झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून काही मतदारांची नावे यंदा दुसऱ्याच मतदान केंद्रावर दाखवण्यात आली यामुळे संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नवीन केंद्र गाठावे लागले.
नागरिक मतदानापासून वंचित
जिल्हा प्रशासन व अन्य शासकीय यंत्रणांमार्फत विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. स्वीपअंतर्गत शहरातील गल्लोगल्ली तसेच गाव पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली होती. मतदारांना घराबाहेर पडत मतदान करावे. असे आवाहन करण्यात आले होते. यावर्षी 75 प्लस टक्के मतदानासाठी प्रशासन आग्रही होते. परंतु प्रशासनाकडून स्तुत्य उपक्रम राबवत असताना शेकडो मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याचा प्रकार घडल्यामुळे अनेक नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम