मुंबई – शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीच्या घोषणेनंतर आता एक मोठी बातमी हाती लागली आहे. संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघानेही शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांच्या युतीला पाठींबा दर्शवला आहे.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या युतीच्या घोषणेनंतर आता संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असलेल्या मराठा सेवा संघाने शिवसेना-संभाजी ब्रिगेड यांच्या युतीला पाठींबा देत आगामी २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेत आणण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी आता मराठा सेवा संघात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचे सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
मराठा सेवा संघाचा आज ३२वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने झालेल्या बैठकीत मराठा सेवा संघात तरुणांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात येणार आहे. केवळ ३० टक्केच जुने जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत राहतील. तसेच या फेरबदलानुसार, मराठा सेवा संघाची जबाबदारी आता ४० वर्षांच्या आतील आणि मराठा समाजाच्या शासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. यासाठी मराठा सेवा संघ लवकरच राज्यभर बैठका सत्र घेणार असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी सांगितले आहे.
मराठा सेवा संघाने पुनर्गठन करून राज्यात आता जी नवी युती झालीये, तिला आमचा पाठींबा असणार आहे. ही युती समवैचारिक संघटनेची युती आहे, त्यामुळे मराठा सेवा संघ शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडला सत्तेवर आणण्यासाठी पूरक वातावरण तयार करणार आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार आहोत, असे अर्जुन तनपुरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मराठा सेवा संघाचे संथापक पुरुषोत्तम खेडेकर यांनीदेखील शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीचे समर्थन केले आहे. त्यांनी ह्या युतीचे स्वागत करताना म्हणाले, की ही युती लवकरच राज्यात वेगळे वळण देईल. किमान समान कार्यक्रम राबवून आगामी काळात आमचे नेते योग्य वाटाघाटी करतील आणि सर्व निवडणुका एकत्र लढतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम