Nandurbar : येत्या दोन वर्षांत राज्यातील सर्व आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे बांधकाम पूर्ण करून त्यांना स्वमालकीच्या इमारती असतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते नंदुरबार तालुक्यातील भालेर, वाघाळे, येथील शासकीय मुला-मुलींच्या नूतन वसतीगृह/ आश्रमशाळांच्या इमारतीच्या उद्धटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम पाटील, राजश्री गावित, सरपंच सरिता वळवी (लोय), सोनाली वळवी, (भवानीपाडा), उपसरपंच अमन पाडवी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) उपअभियंता ए.पी.चौधरी, सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, के.एस.मोरे यांच्यासह स्थांनिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.गावित म्हणाले की, नजीकच्या काळात शासनाने आदिवासी विकास विभागाला बऱ्याच ठिकाणी नवीन आश्रमशाळा व वसतीगृहांच्या नवीन इमारती बांधण्यास निधी दिला आहे. राज्यात ज्या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा व वसतीगृहाच्या नवीन इमारती नाही अशा ठिकाणी येत्या दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, चांगल्या पदावर नोकरी मिळावी या त्याचा मागचा हेतू आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर्षी 56 नवीन इमारती बांधण्यास मंजूरी दिली त्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक आश्रमशाळा, वसतीगृहाचा समावेश आहे. या सर्व इमारतीचे बांधकाम त्या लवकरच सुरु होवून त्या लवकरच पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आश्रमशाळेतील विद्यार्थी हे इतर समाजातील विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी येत्या काळात राज्यात करीअर ॲकेडमी काढण्याचे नियोजन असून येथे नियमित शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेचे शिक्षण देण्यात येईल. सुविधा मिळत नाही म्हणून विद्यार्थी मागे पडला म्हणून हे घडता कामा नये यासाठी शिक्षणासाठी ज्या ज्या सुविधा लागतील त्या सर्व उपलब्ध करुन देण्यात येईल.यासाठी आदिवासी विकास विभागातून आवश्यक ती निधीची तरतूद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना म्हणाले की, आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य वेळेवर खरेदी करण्यासाठी नवीन पद्धतीचा अवलंबून पुर्वी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येत होते त्या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. अनुदानित आश्रमशाळा,नामांकित शाळा, तसेच इंग्रजी शाळेतील इयत्ता पहिली ते नववी पर्यंत 100 टक्के विद्यार्थ्यांची पटसंख्या असते, परंतू दहावीला विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असते या कारणाचा शोध घेवून पहिली ते नववीपर्यंत जेवढे विद्यार्थ्यांची असतील ती पटसंख्या गृहीत धरुन सर्व संस्थाचालकांकडून मागील काळातील वसुली करण्यात येईल.
यावर्षांपासून प्रत्येक आश्रमशाळेत वॉशिंग मशीन देण्यात येईल. येत्या दोन वर्षांत आश्रमशाळेच्या ठिकाणी शिक्षक,कर्मचारी यांचे निवासस्थान बांधण्याचे नियोजन आहे. जेणे करुन आश्रमशाळा ही जी संकल्पना आहे ती यशस्वी पणे पार पाडता येईल. प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल हा 100 टक्के लागावा यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळेत एकाच पद्धतीने अभ्यासक्रम शिकविले जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची दोन तीन महिन्यांनी परीक्षा तसेच शिक्षकांच्याही परीक्षा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती. करनवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम