नवी दिल्ली – ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. नुकताच १६ ऑगस्टला त्यांनी पक्षाच्या जम्मू काश्मीर प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते. त्यानंतर अखेर आज त्यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानी पत्र पाठवत पक्षाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
Congress leader Ghulam Nabi Azad severs all ties with Congress Party pic.twitter.com/RuVvRqGSj5
— ANI (@ANI) August 26, 2022
राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर, खासकरुन जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर याआधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. तसेच पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहेत. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचे होतं, अशी टीका करताना पक्षाचा २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात राहुल गांधींचा मोठा वाटा होता असा दावा त्यांनी केला आहे.
लवकरच नवा पक्ष काढणार – आझादांचे संकेत
काही आठवड्यांपूर्वीच गुलाम नबी आझाद यांना पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच त्यांनी राजीनामा दिला होता. प्रकृतीच्या कारणास्तव आझाद यांनी ही नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे सांगितले जात होते. मात्र यानिमित्ताने, बऱ्याच काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते लवकरच नवा पक्ष काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
गुलाम नबी आझाद कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्रीदेखील होते. त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम पहिले. तसेच पक्षाची अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. पक्षात संघटनात्मक बदल व्हावेत यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या जी-२३ नेत्यांमध्येही त्यांचा समावेश होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम