kolhapur | ‘गोकुळ’ विरोधात शेतकरी आक्रमक; कार्यालय व चिलिंग सेंटरची मोडतोड 

0
2

kolhapur : कोल्हापूर दूध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच गोकुळकडून दोन रुपयांनी गाईच्या दुधाच्या दरांत कपात करण्यात आल्यानंतर दूध उत्पादक शेतकरी व संघटनांकडून जागोजागी संताप व्यक्त केला जात आहे. गायीच्या दुधाचा दर पूर्ववत करावा, अशी मागणी कोल्हापूर  जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. गोकुळतर्फे अजून याबद्दल कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. परंतु, दुसरीकडे संघटनांकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. आज शिरोळ तालुक्यातील गोकुळचे चिलिंग सेंटर आंदोलकांकडून बंद पाडण्यात आले आहे. यावेळी दूध वाहतूकीच्या गाड्यादेखील अडवण्यात आल्या आहेत.

म्हशीच्या दूध दरात वाढ; गायीच्या दूध दरात कपात

नुकतंच, काही दिवसांपूर्वी गोकुळकडून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरांत प्रतिलिटर दीड रुपयांनी वाढ करण्यात आली. एकीकडे म्हशीच्या दुधाच्या दरांत वाढ केली असली, तरी दुसरीकडे गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. राज्यात इतर दूध संघांचेही गाईच्या दुधाचे दर कमी झाले आहेत. बाजारपेठेत दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. यागोष्टींचा विचार करुन गाय दूध दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे, गोकुळचे अध्यक्ष डोंगळे यांनी म्हटले होते. पण, शेतकऱ्यांनी गायीच्या दुधात कपात झाल्यानंतर संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस दुग्ध व्यवसाय हा संकटात जात असताना गोकुळ संघाकडून अचानक दर कपात करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक संकटांत सापडला आहे. त्यामुळे दर वाढ नसली, तरी आहे तो दर पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

चिलिंग सेंटरची मनसेकडून मोडतोड

दोन दिवसांपूर्वी,शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळ संघाच्या बोरवडे येथील चिलिंग सेंटरची तोडफोड केली होती. यावेळी आंदोलकांनी खिडकीच्या काचा व शाखाप्रमुखांच्या कार्यालयाची मोडतोड केली. मारहाण केल्यामुळे गोकूळचे तीन कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. या घटनेबाबत शाखाप्रमुख विजय कदम यांनी मुरगूड पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले आहे. दरकपातीच निर्णय मागे घ्यावा आणि गाय दूधदर पूर्ववत करावा या मागणीसाठी मनसेचे १० ते १५  कार्यकर्ते बोरवडे येथील चिलिंग सेंटरवर आले. संकलन सुरु असल्यामुळे शाखाप्रमुखांनी त्यांना चर्चेसाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले. चर्चा सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. शाखाप्रमुखांच्या टेबलाचीही काच फोडून त्याची तोडफोड केली. या फुटलेल्या काचा तेथील उपस्थित कर्मचार्‍यांना लागल्याने कर्मचारी जखमी झाले आहेत.कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन कर्मचार्‍यांना काठीने मारहाण करत जखमी केले असल्याची माहिती शाखाप्रमुखांनी दिली. (kolhapur)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here