द पॉइंट नाऊ ब्यूरो : देशात निवडणुकांचे वारे वाहत असून रंगतदार निवडणूक होत आहे. महाराष्ट्रासह राजस्थानमध्ये निवडणूक होत आहे मात्र, राजस्थान राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) आमदारांची मते देताना मोठा गोँधळ घातला आहे. मतदान चुकीचे झाले आहे. यातील एका आमदारानं तर चक्क काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराला मतदान केलं आहे यामुळे सर्वच अवाक झाले, तर दुसऱ्या भाजप आमदारानं भाजपच्या दुसऱ्याच उमेदवाराला मत दिलं आहे. यामुळे भाजप पुरस्कृत उमेदवार अडचणीत आले आहेत. आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीही त्यांच्या विजयाची आशा सोडून दिली आहे हा भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
राजस्थानमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर उद्योगपती सुभाष चंद्रा (Subhash Chandra) मैदानात उतरले असून भाजप आमदारांनी मतदानात घातलेल्या घोळामुळं चंद्रा यांच्या विजयाची शक्यता मावळली आहे. याबाबत राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनीच याबाबत महिती दिली आहे. पूनिया यांनीच आधी भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असा दावा केला होता. आता यू-टर्न घेत भाजपचा एक उमेदवार निवडून येईल, असे त्यांनी जाहीर केले. आम्ही भाजप पुरस्कृत उमेदवारासाठी प्रयत्न करून काँग्रेसला गुडघ्यावर आणले, असा दावाही त्यांनी केला. यामुळे भाजपा तोंडघशी पडली आहे.
राजस्थान मधील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकून भाजप सत्तेत येईल, असाही दावा पूनिया यांनी केला. दरम्यान, राजस्थानमध्ये राज्यसभेच्या (Rajya Sabha) चार जागा आहेत. यातील दोन जागा काँग्रेस आरामात जिंकू शकते तर भाजपला एक जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील नेते प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिली. यानंतर भाजपने सुभाष चंद्रा यांना पाठिंबा देत मैदानात उतरवले. चंद्रा हे झी माध्यम सूमहाचे मालक असून, एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष देखील आहेत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
भाजपच्या आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले. यामुळे त्यांचे मत बाद केले आहे. दुसऱ्या आमदार सिद्दी कुमारी यांना मत देताना गोंधळ घातला. भाजप पुरस्कृत सुभाष चंद्रा यांना मत द्यायचे होते. प्रत्यक्षात त्यांनी भाजपचे उमेदवार घनश्याम तिवारी यांना मतदान केले. याचवेळी भाजपचेच आमदार कैलास मीना यांनी मत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दाखवल्याचा आक्षेप काँग्रेसनं घेतला आहे. यामुळे त्यांचेही मत बाद होण्याची शक्यता आहे. या सर्व गोंधळाचा फटका चंद्रा यांना बसण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्येे पाच उमेदवार मैदानात आहेत. माजी मंत्री घनश्याम तिवारी हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. राज्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असे दोन गट आहेत. काँग्रेसने तिवारी यांच्यासह प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसनं दिलेले हे तिन्ही उमेदवार राज्याबाहेरील असल्यानं आमदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. याचाच फायदा घेण्याच्या हेतूने भाजपने राज्यसभेसाठी चंद्रा यांना पाठिंबा जाहीर करून त्यांना निवडणुकीत उतरवलं होतं. मात्र ते शक्य झाले नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम