Education News | छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 मध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पध्दतीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे 16 अभ्यासक्रम शिकण्याची सोय असणार आहे. विद्यार्थ्यांना नववीपासूनच आपल्या भविष्याची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे दहावी, बारावीनंतर आता इयत्ता नववीलादेखील महत्त्व आले आहे.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेवून भविष्य घडवण्याबाबत विद्यार्थी अनेकदा तणावाखाली असतात. त्यामुळे विद्यार्थी महागडे कोचिंग क्लासेस लावत असतात. त्यात विद्यार्थी नापास झाले तर अनेकवेळा टोकाचे पाऊलदेखील उचलतात. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय ‘फ्रेमवर्क’ नुसार परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे की, विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे आहे हे स्वतः ठरवता येणार आहे. दहावीपर्यंत विविध विषयांचा तपशीलवार अभ्यास करून जाणून घेतल्यावर त्याला अकरावीमध्ये तीन पर्याय मिळतील.
पहिल्या पर्यायात मानवता, सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित आणि संगणक हे विषय असणार आहेत. दुसऱ्या पर्यायात आंतरविद्याशाखीय क्षेत्र असेल, ज्यांना पदवीनंतर संशोधन क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे त्यांच्यासाठी हा पर्याय असेल. तर तिसऱ्या श्रेणीत लेखक, क्रीडा आणि व्यावसायिक हे विषय निवडण्याचा पर्यायही असेल. इयत्ता दहावी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नववी, दहावी या दोन वर्षात एकूण आठ अभ्यासक्रमांपैकी प्रत्येकी दोन आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहेत. सध्या दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांचा अभ्यास करावा लागत असतो परंतू, नव्या नियमांमध्ये आठ विषय देण्यात आलेले आहेत. यामध्ये मानवता, गणित, संगणक, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विषय आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम