Deola | वसाका विक्री न करता भाडे करारावर द्यावा; आ. आहेरांसह शिष्टमंडळाची अजित पवारांकडे मागणी

0
94
Deola
Deola

देवळा :  विठेवाडी येथील बंद अवस्थेत असलेला वसंत दादा सहकारी साखर कारखाना उर्जित अवस्थेत येण्यासाठी त्याची विक्री न होता शिखर बँकेने भाडे कराराने चालविण्यास द्यावा, अशी मागणी आज शुक्रवारी (दि.२) रोजी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदनाद्वारे केली. या संदर्भात मंत्रालयात सोमवारी (दि.५) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील विठेवाडी येथील वसंत दादा सहकारी साखर कारखाना हा अग्रगण्य साखर कारखाना असून कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नावारूपास आलेली सहकारी संस्था होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चुकलेले आर्थिक नियोजन, कमी झालेली ऊस उत्पादक क्षमता, बँकेचा वाढलेला कर्जाचा बोझा व इतर कारणास्तव काही वर्षांपासून कारखाना अडचणीत सापडलेला आहे.

Vasaka | आ. आहेरांचे आश्वासन आणि केदा आहेरांच्या ठोस भूमिकेनंतर उपोषण मागे

मागील काळामध्ये कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई (शिखर बँक) यांनी हा कारखाना ताब्यात घेऊन प्रथम अशासकीय मंडळाला व नंतर डि.व्ही.पी ग्रुप, धाराशिव यांना भाडेकराराने चालविण्यास दिला होता. परंतु काही वर्ष कारखाना चालवल्या नंतर डी.व्ही.पी ग्रुपने कारखाना चालविण्यास असमर्थता दाखवल्याने कारखाना सद्यस्थितीत बंद आहे. यामुळे शिखर बँकेने कारखाना विक्रीची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. कारखान्याची विक्री होऊ नये म्हणून गेल्या आठवड्यात कारखाना कार्यस्थळावर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण देखील करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सभासदांनी कारखान्याच्या विक्रीला प्रखर विरोध दर्शविला.

Vasaka | वसाकाच्या विक्री प्रक्रीयेविरोधात संस्थापक अध्यक्षांचे वारसदार आक्रमक

कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार वर्ग व कारखान्याच्या सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून सर्वांची भावना वसंत दादा सहकारी साखर कारखाना विक्री न होता भाडे कराराने चालविण्यास शिखर बँकेने द्यावा ही आहे, अशी मागणी यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून केली. यावेळी अजित पवार यांनी यबाबत सकारात्मक भूमिका घेऊन यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात शिखर बँकेच्या संबंधित सर्व घटकांसोबत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले. मात्र, या चर्चेसाठी शेतकऱ्यांनाही बोलवायला हवे होते, अशी खंत उस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चर्चेसाठी किमान एक दोन उस उत्पादक शेतकरी बोलवले असते तर समाधान वाटले असते. शिष्टमंडळात एक तरी उस उत्पादक होता का..? हा आमचा भोळ्या भाबड्या उस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रामाणिक सवाल आहे. तरी आपण भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्याबद्दल उस उत्पादक संघर्ष समितीकडुन अभिनंदन

– कुबेर जाधव (शेतकरी) 

यावेळी आमदार नीतीन पवार, वसाका बचाव कृती समितीचे निमंत्रक सुनील देवरे, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते उदयकुमार आहेर आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here