सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गिरणा नदीला व इतर कालव्यांना पूरपाणी वाहून जात असले तरी देवळा तालुक्यातील पूर्व भागाला पाण्याची अद्यापही प्रतीक्षा आहे. मात्र चणकापूर उजवा कालवा फुटण्याचे की फोडण्याचे.? प्रकार चालू झाल्याने या भागातील जनतेत तीव्र असंतोष असून आगामी रब्बी हंगामासाठी चणकापूर वाढीव उजव्या कालव्यातून पाणी मिळावे, असा जनरेटा वाढू लागला आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी देखील देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न कायम आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून चणकापूर वाढीव उजव्या कालव्याद्वारे तातडीने पाणी मिळावे अशी मागणी असताना गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.
Deola | देवळा तालुक्याच्या पूर्वभागात पुरपाणी सोडण्यासाठी सांगवी येथे आमरण उपोषण
देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील वाखारी, वाखारवाडी, खुंटेवाडी, पिंपळगाव, मेशी, दहिवड आदी गावांमध्ये अद्याप दुष्काळी परिस्थिती असून धरणे, तलाव, विहिरी कोरड्याठाक आहेत. त्यासाठी या गावांना वाढीव कालव्याचे पाणी मिळेल आणि आपला दुष्काळ हटेल अशी आशा आहे. परंतु पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कालव्याचे पाणी पुढे सरकत नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.
पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून चणकापूर उजवा कालव्याच्या मदतीने रामेश्वर धरणापर्यंत चणकापूर उजव्या कालव्याचे पूरपाणी सद्यस्थितीत येत असून रामेश्वर धरण पूर्ण भरले आहे. हे पूरपाणी मिळावे यासाठी जनरेटा वाढू लागला आहे. यापूर्वी पाटाचे पाणी राखणे, पाण्यावरून वाद यामुळे गावागावांत ‘तू तू मै मै’ चे प्रकार होत असतात. त्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट लक्ष घालत कालवा अन्य ठिकाणी फुटणार नाही किंवा कोणी फोडणार नाही याबाबत सजगता दाखवणे गरजेचे आहे.
“चालू वर्षी बळीराजाला निसर्गाची चांगली साथ असतांना केवळ नियोजनाच्या अभावामुळे पूर्व भागातील जनता पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता दिसत आहे. जर पूरपाणी देण्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी अयशस्वी ठरले तर येणाऱ्या काळात प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल.”
– भाऊसाहेब पगार (संचालक, देवळा बाजार समिती)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम