Deola Bajar sameeti election: देवळा बाजार समिती निर्मिती ठरली तालुक्याच्या राजकारणाची ठिणगी

0
9

अंकिता जाधव ( विशेष प्रतिनिधी )
Deola Bajar sameeti election: जिल्ह्यात बाजार समिती निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली. या पार्श्भूमीवर देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक देखील महत्वाची ठरणार आहे. या बाजार समितीचा प्रवास आपण या लेखातून बघणार आहोत.

‘नाना’ – ‘आबा’ वज्रमूठ दाखवणार की सत्ता वाटून घेणार ? ; देवळा बाजार समिती निवडणूकीत विक्रमी अर्ज

राज्यात 1995 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे सरकार आले. देवळ्याचे सुपुत्र स्व. डॉ. डी. एस. (बाबा) आहेर हे राज्याचे मंत्री झालेत. त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या कालावधीत देवळा तालुका निर्मिती झाल्यानंतर कळवण मार्केट कमिटीचे विभाजन करून देवळा बाजार समिती स्वतंत्र तयार करण्यात यावी याची चक्र वेगाने फिरू लागली. कारण त्या काळात कळवण बाजार समितीत कांदा किंवा इतर कोणताही व्यापार मोठ्या प्रमाणात होत नसे. देवळा उपबाजार म्हणून कार्यरत असताना कळवण बाजार समितीचा सर्व महसूल देवळा उपबाजारावर अवलंबून होता. देवळा तालुका निर्मिती झाल्यानंतर देवळा तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती असावी अशी मागणी स्वाभाविक होती आणि तशी मागणी झालीही. तत्कालीन पत्रकार संघाच्या माध्यमातून डॉ. दौलतराव आहेर, ए.टी. पवार, शांतारामतात्या आहेर या परस्पर विरोधी लोकांना एकत्र आणून कळवण बाजार समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे शिवधनुष्य पत्रकार नितीन शेवाळकर यांच्या माध्यमातून पेलण्यात आले. (Deola Bajar sameeti election)

देवळा बाजार समितीची निर्मिती करून केदा आहेर यांना प्रशासकीय संचालक मंडळात सभापती बनविण्याची यादी शासन दरबारी तयार झाली. परंतु लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणूक घेण्याचे स्व. प्रमोद महाजन यांचे आडाखे युतीचे सरकार सहा महिने आधीच घालविण्यासाठी कारणीभूत ठरले, आणि आचारसंहितेमुळे प्रशासक मंडळाची यादी की ज्यात केदा आहेर सभापती होते शासन दरबारी मध्यातच लटकली. विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत नवीन सरकार दिले आणि देवळा बाजार समितीच्या प्रथम सभापती होण्याच्या केदा आहेर यांच्या मनसुब्यावर पाणी पडले. नव्हे नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते सुधाकरनाना कोठावदे व उदयकुमार आहेर यांच्या माध्यमातून ते पाडले गेले. यादी जाहीर होण्याच्या अखेरच्या क्षणी सदर यादीतील सभापती हा माजी मंत्री दौलतराव आहे यांचा पुतण्या असल्याची बाब या दोघांनी स्वर्गीय ए. टी. पवारांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमधील तत्कालीन पणनमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली आणि सदरची यादी अखेरच्या क्षणी थांबली. (Deola Bajar sameeti election)

देवळा बाजार समिती निवडणुकीत विक्रमी अर्ज; नानांच्या ‘होम मिनिस्टर’ मैदानात चुरस वाढणार

तदनंतर देवळा बाजार समितीची निर्मिती करण्याचा विडा स्वर्गीय सुधाकर नाना कोठावदे यांनी उचलला. तत्कालीन मंत्री स्व. ए.टी. पवार यांचे चिरंजीव सध्याचे आमदार नितीन पवार हे कळवण बाजार समितीला तर देवळातील स्व. नेते सुधाकर नाना कोठावदे हे देवळा बाजार समितीला शासन नियुक्त सभापती म्हणून ए. टी. पवारांनी पुरस्कृत केले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजार समितीत कांदा व्यापारी सभापती नको असे म्हणत स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या माध्यमातून शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी राज्यमंत्री स्व. ए.टी. पवार यांनी शासनाला दिलेली प्रशासक मंडळाची यादी सुमारे वर्षभर रोखून धरली होती. त्यामुळे बाजार समितीचे विभाजन देखील सुरुवातीच्या काळात सहा महिने आणि नंतरच्या काळात सुमारे वर्षभर थांबले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगदी राज्य पातळीच्या नेत्यांपर्यंत हा विषय चर्चिला गेला आणि शेवटी सुधाकरनाना कोठावदे हे तत्कालीन राज्यमंत्री स्व. ए. टी. पवारांच्या आदळआपटी नंतर प्रथम सभापती झाले. त्यावेळी उदयकुमार आहेर यांनी जी यादी शासनाकडे सुपूर्द केली होती त्या यादीत सभापती म्हणून शेतकरी संघटनेचे नेते व हाडाचे शेतकरी विठेवाडीचे फुलाआप्पा जाधव तर उपसभापती पदासाठी वाजगावचे सुनील धर्मराज देवरे यांचे नाव रेटून धरले होते.

स्वतःचे नाव अगदी संचालक पदासाठीही न देता शेतकरी प्रतिनिधींना बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात न्याय मिळावा ही उदयकुमार आहेर व विनायकराव मेटे यांची भूमिका तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व सुधाकर नानांचे वरदहस्त बबनरावजी पाचपुते यांना पुरती अडचणीत आणणारी ठरली होती. या मुद्द्याच्या आधारावर सुधाकरनानांना जेरीस आणणारा कार्यकर्ता म्हणून उदयकुमार आहेर यांची ओळख संपूर्ण तालुक्यात झाली. त्यानंतरच्या लगेचच्या पुढच्या काळात आलेल्या ग्रामपालिका निवडणुकीत सुधाकरनानांना उदयकुमार आहेर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यावेळी सुधाकरनानांच्या सोबत केदानाना आहेर व योगेशआबा आहेर यांची देखील भक्कम साथ होती. हे विशेष!! म्हणजे हा विजय उदयकुमार आहेर यांनी एक हाती मिळवला होता. अशा पद्धतीने देवळा बाजार समितीचे प्रथम सभापती सुधाकर नाना कोठावदे यांच्या वादळी राजकीय कारकीर्दीचा शेवट झाला. या सर्व राजकारणाला देवळा बाजार समितीच्या निर्मितीची पार्श्वभूमी आहे आणि केदानाना आहेर व उदयकुमार आहेर यांच्या राजकीय वादाला देखील याच बाजार समिती निर्मितीची किनार आहे. (Deola Bajar sameeti election)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here