Skip to content

देवळा – कळवण रस्त्यावर अपघात ; दोन जण ठार


देवळा : देवळा कळवण रोडवरील भऊर फाट्याजवळ आज सोमवार (दि.२७) रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान समोरासमोर झालेल्या दोन्ही दुचाकीच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले . याबाबत देवळा पोलीस ठाण्यात सांयकाळी उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा कळवण रोडवरील भऊर फाट्याजवळ हा अपघात झाला.
उमराणे ता.देवळा येथील निवृत्त वनपाल नानासाहेब कारभारी देवरे ( वय ५९) हे आपल्या मोटारसायकलने कळवणकडून देवळ्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी देवळ्याकडून शिऊर बंगला ता.वैजापूर येथील सागर सनुर विके (वय ४७) हेही मोटारसायकलने (एमएच२०जीए ६०७२) कळवणकडे जात असताना खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात या दोन्ही दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

अतिरक्तस्राव व डोक्याला मार लागल्याने या दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील नानासाहेब देवरे हे सध्या चांदवड येथील डावखरनगर येथे राहत होते. देवळा तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका
सरचिटणीस दिशांत देवरे यांचे ते वडील होत. रात्री उशिरा उमराणे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान , देवळा – कळवण रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून , सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते . याठिकाणी खराब रस्त्याअभावी वारंवार अपघात घडत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी यावेळी केली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!