गद्दाराने गद्दारी केली, ते गद्दारच असतात – उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर घणाघात

0
32

मुंबई : आतापर्यंत सर्वांनी १० तोंडाचा रावण पहिला. पण मी हा ५० खोक्यांचा रावण पाहिला, याचा मला वाईट वाटतंय आणि संतापही येतोय. अश्या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा नुकताच पार पाडला. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मोठ्या संख्याने उपस्थित शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. व भाषणाची सुरुवात करताना आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झाला आहे व अभूतपूर्व आहे. यामुळे मी भारावून गेलो आहे.

तसेच याच मैदानावर मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, तेव्हाही मी नतमस्तक झालो होतो. मी कोणत्याही अनुभवाशिवाय तुमच्या प्रेमाच्या जोरावर राज्याचा कारभार केला. त्यामुळे अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नसतानाही तुमच्यासमोर मला तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.

तसेच शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, मेळाव्यासाठी इकडे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही, सर्व एकनिष्ठ माझ्यासमोर बसलेला आहे. त्यामुळे ही गर्दी विकत मिळत नाही, हे ओरबाडून घेता येत नाही, ही कोरडी गर्दी नाही ही अंत:करण ओले असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे.

उद्धव यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे :

– गद्दाराने गद्दारी केली, ते गद्दारच असणार, मी त्यांना गद्दारच म्हणणार. कारण ही मंत्रीपदे जरी तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही.

– यंदा रावणदहन होणार आहे, पण यावेळचा रावण वेगळा आहे असे म्हणत आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता, आता तो ५० खोक्यांचा खोकासुर झाला आहे.

– मला याचे वाईट वाटते आणि संतापही येतो, जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो. साधी हालचाल ही नीट करता येत नव्हती. तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, तेच लोक पुन्हा उभा राहू नये म्हणून माझ्यावर कटाप्पासारखे कट करत होते.

– जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. म्हणून तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचे की नाही, एकाही एकनिष्ठाने सांगावे की निघून जा, लगेच निघून जाईन. पण हे तुम्ही सांगायचे, गद्दारांनी नाही.

– मी शपथ घेऊन सांगतो, भाजपने आम्हाला अडीच वर्षे वाटून घेण्याचे बोलले असल्याचे म्हटले होते. पण तसा काही भाजपने केले नाही. त्यामुळे भाजपने आमच्या पाठीत वार केला, म्हणून ह्यांना धडा शिकवण्यासाठी मी माविआशी आघाडी केली होती.

– एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागण्याची हिंमत नाही. किमान त्यांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्यापोटी जन्माला आले जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचे नाव लावताय.

– आज आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही.

– देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो. कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसे जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन. पण दीड दिवसात विसर्जन झाले. त्यामुळे आता मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपले काम करेल. तुम्ही गृहमंत्री आहात, आम्ही कायदा पाळतो, पण म्हणून तुम्ही ही डुकरे पाळायची. हे इथे नाही चालणार.

– काय कायद्याच्या चौकटीत बोलायचे ? ते तिथे गेल्यानंतर त्यांच्यातील कुणी गोळीबाराची भाषा करतो. जर हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू.

– मी सांगतो, म्हणून हे सगळे शांत आहेत. जोपर्यंत ते शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या, पिसाळायला लावू नका. जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही.

– हिंदुत्व कसे पुढे न्यायचे, हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. भाजपाने तर शिकवूच नये. कारण, आम्ही मरू तेव्हाही हिंदूच असणार. पण भाजपाने आमच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवायचे का ?

– तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, जरा महागाईवर बोला ना. पण तुम्ही महागाईवर बोललात, तर हे जय श्रीराम म्हणतील.

– आरएसएसच्या होसबाळेंनी भाजपाला आरसा दाखवला आहे, आशा करतो त्यात काहीतरी सुधारणा होईल.

– कोंबडीचोरावर, बापचोरांवर या मेळाव्यात जास्त नाही बोलणार. कारण या व्यासपीठाला एक पावित्र्य आहे.

– अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपाचे घरगुती मंत्री आहेत हेच कळत नाहीये.

– पुष्पा आला होता, झुकेगा नहीं साला म्हणत आणि हे म्हणतात उठेगा नही साला. १०० दिवस होतायत सरकारला, त्यातले ९० दिवस दिल्लीला मुजरा करायला गेले होते.

– एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर येऊन त्यांनी त्यांचे हिंदुत्व सांगावे. मी माझे वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो, कारण बाळासाहेबांनी सांगितले की आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाशी जोडले गेलेले आहे.

– देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. कारण नड्डा म्हणाले, देशात दुसरे कोणताच पक्ष शिल्लक राहणार नाहीत.याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. त्यामुळे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे.

– आज मोहन भागवत महिला शक्तीचा आदर करायचा म्हणतात, पण कुठे आहे महिला शक्तीचा आदर ? असे म्हणत अंकिता खून प्रकरण व बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख यावेळी ठाकरेंनी केला.

– ह्यांना बाळासाहेब पाहिजे, शिवसेना पाहिजे, चिन्ह पाहिजे, शिवाजी पार्क पाहिजे, ही काय बापाची भिक आहे का तुमच्या ? आणि कुठे घेऊन जाणार हे सर्व…

– ज्यावेळी औरंगाबाद व धाराशिवचे नामकरण करण्याचा निर्णय झाला, तेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने याला होकार दिला. पण तेव्हा ५ वर्ष सोबत असताना केला नाही.

– जसे मी बाळासाहेबांना वचन दिले होते, की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. तसेच वचन मी तुम्हाला देतो, तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन.

– हे बांडगुळ आता अंगावर आलेलेच आहेत, तर आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावाच लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावे लागेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here