खरी शिवसेना कोणाची, हे त्या मेळाव्याने दाखवून दिले – फडणवीसांची प्रतिक्रिया

0
59

मुंबई : काल बुधवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, तर बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला होता, त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे व शिंदे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. बंडखोरीपासून ते अनेक राजकीय मुद्द्यांवरून दोघांनी तसेच दोन्ही गटाच्या अनेक नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टोलेबाजीही केली होती, ह्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात होते. त्यावेळी पत्रकारांशी यावर बोलताना फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक करत खरी शिवसेना कोणाची, हे शिंदेंच्या मेळाव्याने दाखवून दिल्याचेही म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिमग्यावर काय बोलायचं, अश्या शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, ठाकरेंच्या त्याच त्याच भाषणाचा आता कंटाळा आला आहे. त्यामुळे आता आपले भाषण लिहिण्यासाठी नवा स्क्रिप्टरायटर नेमण्याची त्यांना गरज आहे. त्यांनी मुळ शिवसेनेचा विचार बाजूला टाकून राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्विकारला, हीच शिवसेनेच्या सगळ्यात मोठ्या फुटीचे कारण आहे. तसेच, ज्या लोकांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत, जे सावरकरांना रोज शिव्या देतात, अशा लोकांसोबत उद्धव ठाकरेंनी बसणे मान्य केले. म्हणून तर ही वेळ त्यांच्यावर आली, असे फडणवीसांनी ठाकरेंवर टीका करताना बोलले आहेत.

यावेळी फडणवीस यांनी शिंदेंचे अभिनंदन करत म्हटले, ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिले की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता ही शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे, पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. आणि राज्यभरातून लोक सभेला आले होते. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात दाखवून दिले असल्याचे म्हणाले आहेत.

यासोबतच कालच्या सभेत शिंदेनी विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याचे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणांची तुलना केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात आम्ही काय करतोय, पुढे काय करणार आहे हे सांगितले. पण मागच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या मेळाव्यात पक्षप्रमुखाचेच भाषण करायचे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकही भाषण केलेले नाही, अश्या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली

तसेच फडणवीस यांनी आगामी महापालिका व विधानसभेवर शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना व भाजप युतीचाच भगवा फडकावणार असल्याचेही  यावेळी बोलून दाखवले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here