एकेकाळच्या कट्टर विरोधकांनी दिला शिवसेनेला जाहीर पाठिंबा !

0
22

मुंबई : एकेकाळी मुंबईत शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ज्या कम्युनिस्ट पार्टीला ओळखले जायचे. त्याच कम्युनिस्ट पार्टीने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, याची प्रचिती आज दिसून आली.

साधारणतः ६० ते ७० च्या दशकात ज्या मुंबईतल्या प्रत्येक कामगाराने, मराठीबहुल भागाने व मुंबईसहित अवघ्या महाराष्ट्राने शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्षातील संघर्ष पाहिला, त्याच मुंबईने आज एक वेगळे चित्र पहिले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. या भेटीमुळे राज्यातील राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा सध्या होत आहे.

राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कारण, याआधी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती केल्यानंतर आता एका राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. म्हणजे ज्यांच्याशी एकेकाळी वैचारिक व सामाजिक वैर होते, ते आता मित्र बनल्याने मोठे राजकीय समीकरण उदयास येणार असल्याची दाट शक्यता होत आहे.

शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर प्रथमच शिवसेनेतील दोन्ही गट अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीत समोरासमोर येत आहे. एकत्र होणार आहे. यादरम्यान, आज दुपारी अडीचच्या सुमारास सदर शिष्टमंडळाने मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भाजपविरोधातील निवडणुकीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी सीपीआयच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत, तर, शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे एकेकाळचे कट्टर विरोधक होते कम्युनिस्ट पार्टी

एक काळ असा होता, जेव्हा शिवसैनिकांनी लालबागमधील कम्युनिस्टचे आमदार कॉ. कृष्णा देसाई यांची हत्या केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार वामनराव महाडिक विजयी झाले होते. आणि त्या घटनेपासून लालबाग-परळसह मुंबईतील डाव्यांच्या राजकीय प्रभावाच्या अस्ताला सुरुवात झाली, असे बोलले जाते. तसेच असाही आरोप करण्यात येत होता, की तत्कालीन काँग्रेस सरकारने गिरणी व अन्य कामगारांवर डाव्यांचा असलेला प्रभाव कमी करण्यासाठी शिवसेनेला पाठबळ दिला आहे. त्यातून शिवसेनेला ‘वसंत सेना’ या शब्दातही टीका त्याकाळी करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हापासून ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे.

पण आता याच कट्टर विरोधकांच्या एकत्र येण्याने नवी राजकीय नांदी होत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, विरोधकांकडून ठाकरेंच्या भाजपविरोधी भूमिकेचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्व विरोधक एकवटणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here