द पॉईंट नाऊ ब्युरो : भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरून आता वाद सुरू झाला आहे. लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे याची मागणी भाजप आणि काँग्रेस दोघांनी केली आहे. तर लतादीदी नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या स्मारकाची गरज नाही. यावरून राजकारण नको, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. त्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावर आता आपले मत मांडले आहे. शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नये, त्याला माझा विरोध आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
राजकीय क्षेत्रात नेहमीच कोणत्याही विषयावर राजकारण पेटत असते. हे नेहमीच दिसून येते. मात्र राजकीय मंडळी राजकारण करतांना कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवता विषय वाढवण्याचा प्रयत्न करतात, हे वारंवार दिसून येते.
भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजे भारताचा एक अनमोल दागिनाच आहेत. त्यांच्यामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. त्यांचा आवाज ही भारताची ओळख बनली. मात्र त्यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीचा विचार न करता, राजकारणी मंडळी मात्र राजकारण करण्यातच स्वारस्य मानण्यात धन्यता समाजताय हेच दिसून येते.
राजकारणाच्या खेळात स्वार्थ नसतो, असं कधी होऊच शकत नाही. त्यातून भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही राजकारणी मंडळींनी सोडले नाही. त्या जाऊन काही तास उलटत नाहीत तोच त्यांच्या नावावर देखील राजकारण सुरू झाले.
या अशा कारणामुळेच बहुतांश लोक राजकारणाला आणि राजकारणी लोकांना नाक का मुरडतात हे स्पष्ट होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम