Congress MLA | नाशकात राजकीय घडामोडींना वेग; ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर..?

0
81
Nashik News
Nashik News

Congress MLA : मुंबई |  गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे पाच आमदार हे चर्चेत आहेत. विधान परिषद निवडणुकीनंतर या आमदारांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यातच यापैकी दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली असून, हे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काल रात्री उशीरा या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे समजते.

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचे आरोप असलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि देगलूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यामुळे हे दोघे आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून कारवाईचे आदेश आल्यानंतर आता कारवाई होण्यापूर्वीच हे आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे.

Congress | तिकिट जाणार अशी चर्चा होताच धडकी भरली; इगतपुरीच्या आमदारांची ‘मुंबईवारी’

Congress MLA |  नेमकं प्रकरण काय..?

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेकापचे जयंत पाटील हे पराभूत झाले. याचे कारण म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटली आणि काँग्रेसच्या या फुटलेल्या मतांचा फायदा भाजप आणि अजित पवार गटाला झाला. यात सहा मतं ही अजित पवार गटाला मिळाल्याचे दिसून आले होते. कारण अजित पवार गटाला ६ जास्तीची मतं पडली होती. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ ते ८ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे बोलले जात होते.

यापैकी पाच आमदारांवर शंकेची सुई अडकलेली असून, काँग्रेसला आधीच संशय असल्याने पक्षाकडून सापळा रचण्यात आला होता आणि या सापळ्यात हे काँग्रेसचे फुटीर आमदार अडकले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या हाय कमांडने या फूटीर आमदारांवर थेट कारवाई न करता त्यांना गाफील ठेऊन निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्याचे आदेश नाना पटोले यांना दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर फुटीर आमदारांचे धाबे दणाणले आणि त्यांची पळापळ सुरू झाल्याचे दिसते. या प्रकरणी सुरुवातीपासून पाच आमदारांची नावे घेतली जात आहेत.

Congress MLA | ‘त्या’ फुटीर आमदारांची नावे समोर; नाशिकच्याही एका आमदाराचा समावेश..?

काँग्रेसचे क्रॉस व्होटिंग करणारे संभाव्य आमदार..?

  1. सुलभा खोडके- अमरावती
  2. झिशान सिद्दीकी- वांद्रे पूर्व
  3. हिरामण खोसकर- इगतपुरी (अ.जा)
  4. जितेश अंतापूरकर- देगलूर (अ.जा)
  5. मोहन हंबर्डे- नांदेड दक्षिण

हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण..?

दरम्यान, या भेटीच्या चर्चांवर आमदार हिरामन खोसकर म्हणाले की,”मी काँग्रेससोबत होतो आणि मी पुढेही काँग्रेससोबतच राहणार आहे. मला पक्षाकडून उमेदवारीदेखील मिळणार आहे. मी काल केवळ निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असं स्पष्टीकरण आमदार खोसकरांनी दिलं आहे.

जितेश अंतापुरकर काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर आमदार जितेश अंतापुरकर म्हणाले की,”आमच्या भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याने मी ई-पिक पाहणीच्या अहवालासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मला मुख्यमंत्र्यांनी जी वेळ दिली होती. त्यानुसार मी त्यांची भेट घेतली. यात कुठलीही राजकीय चर्चा केलेली नसल्याचे” आमदार जितेश अंतापुरकर म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here