देवळा : देवळा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवारी( दि ३१ ) रोजी अखेर एकूण ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण अठरा जागांसाठी सोमवारी (दि २७) पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली आहे .
बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर , माजी उपसभापती दिलीप पाटील , माजी संचालक सुनील देवरे , संजय शिंदे , जगदीश पवार , माजी सरपंच दीपक बच्छाव , सरपंच स्वप्नील अहिरे , युवा उधोजक कैलास देवरे , माजी सरपंच शिवाजी अहिरे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या पत्नी खर्डे विकास सोसायटीच्या चेअरमन दीपाली जाधव तसेच , उपसरपंच सुनील जाधव , विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव आदी मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस पाहावयास मिळणार आहे .
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी दि ३ एप्रिल रोजी अंतिम मुदत असून , या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशासक व सहायक निंबंधक सुजय पोटे कामकाज बघत आहेत .गट निहाय दाखल अर्ज पुढील प्रमाणे सोसायटी गट (३१) ,व्यापारी गट ( ६) ,हमाल व तोलारी गट( ३) ,ग्रामपंचायत गट (११) याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली . दरम्यान ,बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावांत इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून , उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याची लगभग पहावयास मिळत आहे .
यानिमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला असून , निवडणूक बिनविरोध होणार कि ,चुरशीची लढत रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. खरे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम