Malegaon | शिवसेना (उबाठा) गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरिता बनावट दस्तऐवजांच्या आधारे ७.४६ कोटी कर्ज घेऊन कर्जाची परतफेड न करत फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सरकारी वकिलाने दिलेल्या कर्ज रक्कमेचा एकही हप्ता भरलेला नाही. तारण दिलेल्या सुतगिरणी आणि जमीन विक्रीतून अवघे १ कोटी ७८ लाख रुपयेच मिळालेले आहे. कर्ज रक्कमेपैकी सुमारे ६ कोटी रुपये हे व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले आहेत. यातून त्यांनी काय व्यवहार केले? या पैशांचा दुरुपयोग कसा केला? याची चौकशी करावयाची आहे असे सांगत सात दिवसाच्या कोठडीची मागणी केली.
याउलट हिरेंतर्फे ॲड. एम. वाय. काळे यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला असून, गुन्ह्यातील कागदपत्रही जप्त करण्यात आलेली आहेत. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद केला होता. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकूण न्या. बघेले यांनी हिरे यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तब्बल दोन तास या प्रकरणी न्यायालयीन कामकाज सुरु होते. न्यायालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर हिरे समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. समर्थक, कार्यकर्ते न्यायालयाबाहेर अद्वय हिरे तुम आगे बढो, अद्वय हिरे जिंदाबाद अशा घोषणा देत होते.
नेमका गुन्हा काय
डॉ.अद्वय हिरे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असतांना सन २०१३ मध्ये त्यांनी रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेच्या नावाने तीन टप्प्यात ७.४६ कोटी रुपये इतके कर्ज घेतले. या सुतगिरणीच्या स्मिता हिरे या अध्यक्षा होत्या. कर्ज रक्कमेसाठी तारण देण्यात आलेली जमीन ही तुलनेने कमी किंमतीची होती.
कागदपत्रांची शहनिशा न करताच हे कर्ज देण्यात आले होते. कर्ज रक्कमेतील ६ कोटी रुपये व्यंकटेश बँकेत वर्ग करण्यात आले. कर्जाची रक्कम मुळात रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी विनियोग झालेलीच नाही. त्यातच कर्ज दिलेल्या रक्कमेचा एकही हप्ता न भरल्यामुळे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन रमजानपुरा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता.
७ कोटी कर्ज रक्कम ही व्याजासह २५ कोटीहून अधिक झाल्यामुळे हा गुन्हा नाशिक ग्रामीणचे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात हिरे यांनी अपर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान, त्यांचा जामीन अर्ज हा फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हिरे फरार झाले. दरम्यान, पोलिसांनी त्यांना भोपाळ येथून अटक केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम