Satara : तो भूमिपूजन वाद खा.उदयनराजे आणि आ.शिवेंद्रराजेंना भोवला ५० जणांवर गुन्हे दाखल….

0
50

Satara : साताऱ्यात नुकताच एक भूमिपूजन सोहळा पार पडला आणि त्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये झालेल्या राड्यातून खासदार उज्जा उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह तब्बल पन्नास जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मालमत्तेचे नुकसान, गर्दी जमवणे आणि दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी केलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यामध्ये साताऱ्यात भूमिपूजनाप्रसंगी राडा झाला. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये 16 एकर जमिनीवरून वाद रंगला असल्याचे यावेळी पाहायला मिळालं. खासदार उदयनराजेंच्या नावे असलेली ही जमीन आमदार शिवेंद्रराजेंच्या ताब्यात असलेल्या सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावे झाली आणि बुधवारी या ठिकाणी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बुधवारी बाजार समितीच्या भूमिपूजनामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघेही आक्रमक झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील जुंपल्याच बघायला मिळालं.

 

जवळपास अडीच ते तीन तास हा राडा सुरू होता. पुणे-बेंगलोर महामार्गावर असलेल्या सातारा हद्दीतील उदयनराजेंच्या जमिनीवरून हा वाद झाला असल्याचं बोललं जात आहे. शिवेंद्रराजेंना त्या ठिकाणी भूमिपूजनाचा नारळ फोडायचा होता. तर उदयनराजेंना याला विरुद्ध दर्शवायचा होता. यासाठीच ही खडाजंगी बघायला मिळाली. याच भूमिपूजनाच्या एक तास आधीपासूनच उदयनराजेंनी जेसीबी सकट या ठिकाणी ठिय्या मांडल्याचं बघायला मिळालं. बाजार समितीने उभारलेल्या ऑफिसचा देखील यावेळी उदयनराजेंनी चक्काचूर केला. काही वेळाने आपल्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी दाखल झालेल्या शिवेंद्रराजांनी हा प्रकार पाहिल्याने हा वाद आणखीनच पेटला, पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना देखील हे दोन्ही गट जुमानले नाहीत.

इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राडा सुरू असताना देखील शिवेंद्रराजेंनी या ठिकाणी नारळ फोडून भूमिपूजन केले. मात्र गर्दी जमवणे, दमदाटी करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी सभापती विक्रम पवार यांनी केलेल्या तक्रारीनुसार खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजेंसह इतर 50 जणांवर गुन्हे सातारा पोलिसात दाखल करण्यात आले आहेत तर पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कराडमध्ये बैठक सुरू असून याच वादावर या ठिकाणी चर्चा होणार असल्याचे देखील बोलल जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here