राणेंच्या बंगल्याला महापालिकेची पुन्हा नोटीस; बांधकाम न पाडल्यास कारवाईचा इशारा….

0
36

मुंबई :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथील आपल्या अधीश बंगल्याचे बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी केलेला अर्ज मुंबई महानगरपालिकेने फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळताना पालिकेने तब्बल १५ कारणे स्पष्ट केली असून, त्यानुसार बांधकाम नियमित करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. तर येत्या १५ दिवसांत बंगल्यातील अवैध बांधकामे स्वतःहून न पाडल्यास पालिका त्वरित कारवाई करेल, असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे.

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम व चिरंजीव नीलेश हे संचालक असलेल्या आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपनीचे कालका रिअल इस्टेट्स कंपनीत 18 ऑक्टोबर 2017 रोजी विलीनीकरण झाल्याने, अधीश बंगल्याची मालकी कालकाकडे आहे. या कंपनीमध्ये राणे कुटुंबीयांचा समभाग असल्याने लाभार्थी मालक म्हणून ते या बंगल्यात राहत आहेत.

या बंगल्यात मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यातील विविध कलमांचा भंग करत अनधिकृत बांधकामे झाली असल्याचा दावा पालिकेने केला आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवतानाच 15 दिवसांत अनधिकृत बांधकाम स्वत:हून तोडले नाही, तर ते पालिकेकडून तोडले जाईल आणि त्याचा खर्च वसूल केला जाईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कालका कंपनीने अॅड. अमोघ सिंग यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत राणे यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते.

पालिकेने दिलेली कारणे

– वास्तुविशारदाने विकास आराखडा 2034नुसार बांधकामांना अतिरिक्त एफएसआयचा (FSI) दावा केला आहे. पालिकेने फेरफार नोंदीच्या आधारे एफएसआय अनुज्ञेय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

– वास्तूच्या प्रत्येक मजल्यावर अतिरिक्त बांधकाम आधीच अस्तित्वात आहे. त्यामुळे संबंधित प्रस्ताव प्रस्तावित कामाच्या कक्षेत येत नाही.

– नियमितीकरणासाठी कोणताही एफएसआय स्वीकारता येणार नाही. पूर्वीच्या मंजूर टेरेसवर (म्हणजे नवव्या मजल्यावर) राहण्यायोग्य बांधकाम करण्यात आल्याने इमारतीची उंची वाढली आहे.

– उंचीमुळे जागेचे क्षेत्रफळ तयार होते. ते वास्तुविशारदाने विचारात घेतले नाही. उंच इमारतीसाठी अग्निशमन विभागाचे, तसेच मालमत्ता कराच्या मंजुरीसाठी मूल्यांकन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र जोडण्या आलेले नाही.

– बंगल्यातील जिना/लिफ्ट/लिफ्टची लॉबी या प्रवेश करण्यायोग्य नसलेल्या जागांना एफएसआय मोफत असल्याचा दावा राणे यांच्या वास्तुविशारदाने केला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here