नाशिक प्रतिनिधी : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असा नावलौकिक असलेली व मागील वर्षी कांद्याला जी आय मानांकन मिळविणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या कांद्याला दैनंदिन लिलावात देशात सर्वाधिक भाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरत निघून नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी, कांदा खरेदीदार व्यापारी तसेच बाजार समितीचे प्रशासन मंडळ यांच्यासोबत याबाबत सविस्तर चर्चा केली
तसेच वरील विषयी संघटनेकडून बाजार समितीच्या कार्यालयात सभापती सुवर्णा ताई जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र देण्यात आले.
कांद्याच्या पिकासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात व देशात नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात नाव लौकिक मिळवलेली एकमेव बाजार समिती आहे.
गेल्या 75 वर्षांपासून कांद्याच्या बाबतीत लासलगाव बाजार समिती आशिया खंडातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ या नावाने नेतृत्व करत आहे परंतु या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कांद्याला अपवाद वगळता नेहमीच नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील किंवा देशातील इतर बाजार समित्यांपेक्षा अपवाद सतत कमी भाव मिळत असतात.
राज्यात सर्वाधिक कांदा उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह औरंगाबाद, धुळे, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांतून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात.
बाजार समितीचा इतका मोठा नावलौकिक असतांना या बाजार समितीत शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे.
म्हणून तरी लासलगाव बाजार समितीने व व्यापारी बांधवांनी पुढाकार घेऊन संपूर्ण देशात दैनंदिन कांदा लिलावात शेतकऱ्यांच्या कांद्याला सर्वाधिक भाव दिले जावे जेणेकरून लासलगाव बाजार समितीचे कांदा बाजार भाव बघून देशातील शेतकऱ्यांचे कांद्याचे बाजार भाव व त्याचा राज्यातील व देशातील कांदा उत्पादकांना मोठा फायदा होईल.
निसर्गाचा लहरीपणा, बोगस बियाणे, पाणीटंचाई, कृत्रिम वीज टंचाई, अतिवृष्टी, गारपिट, इंधन दरवाढ, महागडी खते औषधे, वाढलेले मजुरीचे दर यामुळे कांदा उत्पादनाचा प्रति एकरी खर्च हा प्रचंड वाढला असून येणाऱ्या काळात कमीतकमी प्रति किलो 30 रुपये दर मिळाल्यास कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च भरून निघून थोडाफार नफा होईल यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घ्यावा अशी भावणा श्री भारत दिघोळे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कांदा संघटनेचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले,भावराव कदम, समाधान भड, विष्णू कदम, भाऊसाहेब आरोटे, अनिल आंधळे, जनार्दन कदम, योगेश उशीर,समाधान गचाले, नवनाथ घनघाव आदि शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम