सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | लाल कांद्याच्या भावात सोमवारी (दि.16) रोजी मोठी घसरण झाली असून, अवघ्या तीन दिवसांत १२०० ते १५०० रुपयांनी भाव उतरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने हटविण्याची मागणी आज दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चारच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये साडे तीन ते चार हजारांवर स्थिर असलेल्या लाल कांद्याची लाली आज अचानक कमी झाली. गेल्या आठवड्यात (दि.१३) तारखेच्या दरम्यान सटाणा, लासलगाव, चांदवड, उमराणे, देवळा येथील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या भावात बऱ्यापैकी सुधारणा दिसून येत असतानाच, वाढलेल्या आवकेचे कारण पुढे करून भाव पाडले जात असल्याची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने आज सोमवारी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली.
Deola | देवळा तालुक्यातील पाणी प्रश्नासह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – खा. भगरे
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्याचा थेट परिणाम कांदा भावावर दिसुन येत आहे. केंद सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या २०% निर्यात शुल्कामुळे लाल कांदा निर्यातीवर परीणाम झाला असून, निर्यात शुल्क शून्य करण्याची मागणी दिंडोरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत जोरदारपणे मांडुन सभागृहाचं लक्ष वेधून घेत निर्यात शुल्क तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
मागच्या आठवड्यात चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भावाने विकला जाणारा लाल कांदा आज अचानक अडीच ते तीन हजार रुपयापर्यंत घसरला. ही बाब खासदार महोदयांनी जाणुन घेत संसदेत निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली ते योग्य आहे.
– कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम