Agriculture News | यंदा कडधान्य आयातीमध्ये दुपटीहून अधिक वाढ

0
24

Agriculture News | देशात कमी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे कडधान्याचे उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे देशातील कडधान्य आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक झाली असून एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत देशात जवळपास १५ लाख टनांची आयात झाली. त्यासाठी भारताला १२६ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागलेले आहेत. केंद्र सरकारकडून कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या वल्गना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कडधान्यांसाठी देशाचे आयातीवरील अवलंबित्व वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. (Agriculture News)

अनेक प्रयत्न करूनदेखील भारताला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता गाठता आलेली नाही. यंदा ‘एल निनो’चा फटका बसल्यामुळे कडधान्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला आणि मागणीच्या तुलनेत कडधान्यांच्या पुरवठ्यात मोठा तुटवडा पडला. त्यामुळे आयातीला पाठबळ मिळाले तसेच चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये सुमारे १५ लाख टन कडधान्यांची आयात झाली. मागील हंगामात याच काळात आयात जवळपास ७ लाख टन इतकी होती. उरलेल्या काळात होणारी आयात लक्षात घेता यंदा देशात विक्रमी कडधान्य आयात होणार हे स्पष्ट झालेले आहे. आयात वाढल्याने भारताला अतिरिक्त डाॅलर्स खर्च करावे लागले आणि एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत १५ लाख टन कडधान्य आयातीसाठी भारताला १२६ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागले. तर मागील हंगामात याच काळातील ७ लाख टन आयातीसाठी ५९.५ कोटी डाॅलर्स खर्च करावे लागलेले होते.

मसूर आयातीत झाली तिप्पट वाढ

यंदा भारताने मसूर, तूर आणि उडीद आयात वाढवल्याने एकूण कडधान्य आयात वाढलेली दिसते आहे. विशेषतः मसूरची आयात जवळपास तिप्पट वाढलेली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मागील संपूर्ण आर्थिक वर्षात (२०२२-२३) मध्ये ८ लाख ५८ हजार टन मसुराची आयात झाली होती. म्हणजेच मागील वर्षभरात जेवढी मसूर आयात झाली जवळपास तेवढी आयात आपण यंदा पहिल्या सहामाहीत केली आहे.

तूर आयातदेखील वाढण्याची शक्यता

भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत तुरीची २ लाख ७४ हजार टन आयात केली मात्र मागील वर्षात याच कालावधीत आयात जवळपास दीड लाख टन होती. म्हणजेच यंदा मसूर आयीत सुमारे ८२ टक्के जास्त आहे तर उडदाची आयात ३९ टक्क्यांनी वाढून २ लाख ४० हजार टनांवर पोहोचली आहे.

यंदा तुरीची आयात जास्त होऊ शकते मात्र आयातीची गती धीमी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे आफ्रिकेतील निर्यातदार भारतातील तूर टंचाईचा आणि वाढलेल्या भावाचा फायदा घेत आहेत. गेल्या वर्षीच्या संपूर्ण हंगामाचा विचार केला तर भारताने जवळपास ९ लाख टन तूर आणि ५ लाख २४ हजार टन उडदाची आयात केलेली होती. यंदा आयातीचे प्रमाण यापेक्षा अधिक राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here