मंत्री भारती पवार आ. आहेर राजीनामा द्या; शेतकऱ्यांनी फटकारले

0
20
देवळा येथे केंद्र शासनाने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करतांना कांदा उत्पादक शेतकरी तर दुसऱ्या छायाचित्रात यासंदर्भात तहसीलदार विजय सूर्यवंशी सपोनि दीपक पाटील यांना निवेदन देतांना यशवंत गोसावी, पंडितराव निकम , सुनील आहेर ,विजय पगार आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : कांद्याचा मागील काळात तुटवडा पडला तर इजिप्त मधून कांदा मागवला, टोमॅटो चा तुटवडा पडला तर नेपाळ वरून मागवला, मग आमच्याकडे फक्त मत मागायला येणार का? मत मागायला पण आता नेपाळला जा, गेल्या तीन वर्षांपासून कांदा उत्पादक मरत असतांना आमदार, खासदार कुठे आहेत, त्यांनी तर राजीनामाच द्यायला हवा, फक्त मतदान मागायला येतात मग शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? असा संताप सवाल यशवंत गोसावी यांनी देवळा येथील रास्तारोको आंदोलनात उपस्थित केला.

देवळा येथे केंद्र शासनाने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करतांना कांदा उत्पादक शेतकरी तर दुसऱ्या छायाचित्रात यासंदर्भात तहसीलदार विजय सूर्यवंशी सपोनि दीपक पाटील यांना निवेदन देतांना यशवंत गोसावी पंडितराव निकम सुनील आहेर विजय पगार आदी छाया सोमनाथ जगताप

केंद्र शासनाने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ आज दि. २३ रोजी सकाळी 11 वाजता देवळा पाचकंदील परिसरात विंचूर -प्रकाशा महामार्ग अडवत साधारण एक तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहा.पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

राजेंद्र आहेर यांनी प्रास्ताविक करत शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. व्यापारी वर्गाने बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत त्याला समर्थन करत असलो तरी व्यपाऱ्यांनी त्यांचा मला देखील रोखून ठेवावा, शेतकऱ्यांना वेठीस धरून स्वतःचा माल विक्रीस काढला तर त्या मालाच्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही असे कुबेर जाधव यांनी सांगितले. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा सर्वांनी एकत्र येऊन विरोध करणे गरजेचे आहे तेव्हाच शासन शेतकऱ्यांचा विचार करेल असे मत सुनील आहेर यांनी व्यक्त केले.

ब्रिटिश सरकार पेक्षा अवघड निर्णय घेऊन शासन सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास रेलरोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृष्णा जाधव यांनी दिला. बाळ रडले तरच आई त्याला दूध पाजते मग आपण आपल्या कष्टाच्या दामासाठी कधी रडायला शिकणार, आंदोलना बाबत जागरूकता होणे गरजेचे असल्याचे मत राहुल शिरसाठ यांनी व्यक्त केले. आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्या नावाने मोठं मोठ्याने आवाज देत पिकांची होळी होत असतांना लोकप्रतिनिधी झोपले आहेत का? असा सवाल विनोद आहेर यांनी उपस्थित केला.आमदार यांनी खरीप पीक आढावा बैठक घ्यावी असे नमूद केले.

शासनाने कांदा अनुदान ५० टक्के जाहीर केले आहे, उर्वरित ५० टक्के अनुदान देखील जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे, पर्जन्यमापक चा अहवाल सादर करून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, ४० टक्के निर्यात शुल्क म्हणजे अघोषित निर्यात बंदीच आहे, ती त्वरित मागे घ्यावी अशी मागणी जयदीप भदाणे यांनी केली. सरकारला शेतकरी प्रश्नी वारा देखील जात नाही नाफेड बाबत पारदर्शकता नाही असे मत अरुणा आहेर यांनी व्यक्त केले. तर दि. २६ रोजी तालुका दुष्काळी जाहीर करावा या बाबतच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संजय दहिवडकर यांनी केले.

नाफेड बाबत पारदर्शकता नसताना व शेतकऱ्यांचा नाफेड खरेदीला विरोध असताना नाफेड मार्फत खरेदी का? असा सवाल किरण निकम यांनी उपस्थित केला. तसेच नाफेड खरेदी दर संदर्भात फलक लावण्यात यावे, कोणाचा कांदा नाफेड ने काय दारात घेतला याचा हिशोब बघावा, शेतकऱ्यांची फसवणूक करून फक्त प्रोड्युसर कंपन्या मोठ्या करायचे पाप सरकार करत असल्याचा आरोप देखील यावेळी विनोद आहेर यांनी केला.

आपणास कांदा, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. हे विसरू नका त्यांच्या विरोधात निर्णय घेतले जात असतील तर राजीनामा देऊन रस्त्यावर उतरा अन्यथा पुन्हा मतदार संघात फिरकू नये असे नमूद करत विजय पगार यांनी खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना मतदार प्रश्न बाबत जाणीव करून दिली.

हे सरकार गाजर दाखविणारे सरकार आहे. पुढील येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शेतकरी विरोधी व ग्राहक हिताचे निर्णय घेतले जात आहे. केंद्रात तुमचे ऐकत नसतील तर राजीनामा द्या आणि शेतकरी प्रश्नी रस्तावर उतरा असा सल्ला यावेळी पंडित निकम यांनी विद्यमान आमदार व खासदार यांना दिला.

यावेळी दिनकर निकम, सचिन सूर्यवंशी, माणिक पगार, दिलीप डी आहेर, योगेश पवार, अविनाश बागुल, चिंतामण आहेर, स्वप्नील सावंत, दिलीप आहेर, धनंजय बोरसे, गणेश शेवाळे, सुभाष पवार, हिरामण शेवाळे, बाळासाहेब मगर, निलेश निकम, प्रदीप निकम, हरिभाऊ चव्हाण ,महेंद्र आहेर आदींसह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here