मुंबई : सध्या राज्यात शिवसेनेच्या दोन गटांत जो राजकीय संघर्ष सुरु आहे, त्यावर मनसेने बाजूला होत आपल्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यात मोठा राजकीय संघर्ष सुरु असून, ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला आहे. दरम्यान, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, काल खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर भाष्य न करण्याचे आदेश दिल्यानंतर आज राज ठाकरेंनी यावर कोणीच न बोलण्याचे पुन्हा सांगत आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच, आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देत सर्व पदाधिकाऱ्यांना “६ एम” (6M) चा फॉर्म्यूला यावेळी राज ठाकरेंनी दिला आहे.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत “मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही”, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच, सध्याच्या घाणेरड्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत. त्यामुळे या राजकारणाला पाहता लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील. त्यामुळे आपण आपले विचार सकारात्मक ठेवा, लोकांपर्यंत पोहोचा आणि ‘६ एम’ हा फॉर्म्युला आपल्या मनात रुजवा, असा आदेश राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
काय आहे राज यांचा “६ एम” फॉर्म्युला
दरम्यान, राज यांनी आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना ६ एमचा फॉर्म्युला दिला. ६ एम म्हणजे मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स. पदाधिकाऱ्यांनी या “६ एम” वर आपले लक्ष केंद्रित करावे, असे आदेश दिले.
दसरा मेळाव्यावरूनही राज यांची टीका
या बैठकीत राज यांनी दसरा मेळाव्याचा उल्लेख करत त्यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, की दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. कारण तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसेच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश त्यांनी दिला. तसेच शिवसेनेला सहानुभूती मिळतीये, हा भ्रम असून लोक आपला विचार करतायत. म्हणून आपण यापलीकडे जाऊन लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम