देवळा : तालुक्यातील लोहोणेर गिरणा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या मोबाईल फोन व इतर ऐवजावर डल्ला मारणाऱ्या सात जणांच्या टोळक्याला देवळा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. त्यांच्याकडून मोबाईल व दोन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे गणेशभक्तांच्या मोबाईल फोन तसेच पैशांची चोरी करताना देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सापळा लावून चोरट्याला चोरी करतांना रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन महागडे मोबाईल संच आढळून आले.
मोबाईलच्या बाबतीत विचारणा केली तेव्हा मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरल्याचे कबूल केले. तसेच त्यांचे ७ ते ८ साथीदार चोऱ्या करण्यासाठी आले असून, विविध भागात ग्रुप करुन ते चोऱ्या करत असल्याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचत सहा चोरट्यांना ताब्यात घेतले यावेळी या चोरांच्या टोळक्याकडून महागडे मोबाईल संच आणि दोन दुचाकी जप्त केल्या.
देवळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक निलेश सावकार, पोलीस शिपाई सुरेश कोरडे, जगताप, पोलीस पाटील अरुण उशिरे आदींच्या पथकाने केलेल्या कारवाईचे गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम