मुंबई – आमचीच खरी शिवसेना, असा दावा करणाऱ्या शिंदे गटाने अखेर मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) अर्ज केला आहे. म्हणजेच शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या शिंदे गटाने आता दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
यामुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी यापूर्वी अर्ज दाखल करणाऱ्या व आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शिंदे गटात मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार यंदाही शिवाजी पार्कातच दसरा मेळावा होणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. आज मात्र अचानक शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी BMCकडे दसरा मेळाव्यासाठी रीतसर अर्ज दाखल केला आहे.
BMCमध्ये सध्या प्रशासक राजवट आहे, म्हणजेच महानगरपालिकेचा कारभार हा शिंदे सरकारकडून चालवला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने यापूर्वीच शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल केला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशात आता शिंदे गटाचा अर्ज दाखल झाल्याने BMCसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता, मुंबई महापालिका प्रशासन नेमका काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम