द पॉईंट नाऊ ब्युरो : ईडी हा शब्द सध्या प्रत्येक सामान्य माणसाच्या सुद्धा एक प्रकारे अंगवळणी पडला असेल. कारण ईडीच्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये अनेक मोठमोठे नेते रडारवर आले आहेत. आणि आता महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेनेच्या तक्रारीवरून त्यांचाच आघाडीचा सहकारी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची ईडीद्वारे चौकशी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीने चौकशी केली आहे. शेतकऱ्यांच्या बनावट नावावर कर्ज उचलणे आणि ते आपल्याकडे वळवून घेणे हा त्यांच्यावर आरोप आहे. यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे.
मागील काही दिवसांत राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यात अनेक मोठे नेते अडकले आहेत. यात आता रणजितसिंह शिंदे यांचीही भर पडली आहे.
मात्र या सगळ्यात ईडीचा ससेमिरा फक्त महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमागे आणि त्यांच्या नातलगांमागेच लागत असल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घोटाळे तर बाहेर पडत आहेत, मात्र ते फक्त महाविकास आघाडी सरकारमधीलच कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या नावाचा दुरुपयोग करून शिंदे यांनी जवळपास 500 कोटींचा घोटाळा केल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठीच ईडीद्वारे त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र यावेळी राष्ट्रवादीचाच सहकारी असलेल्या शिवसेनेच्या तक्रारीवरून ही चौकशी झाल्याने, आता महाविकास आघाडीत काय चित्र उभे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम