मनमाड नगरपालिका निवडणुकीचा संभ्रम कायम!

0
46

मनमाड : नगरपालिकेची २९ डिसेंबरला पाच वर्षांची मुदत संपत असूनही निवडणुकीसंबंधी अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. नवीन प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा, वाढीव प्रभाग तसेच ओबीसींचे आरक्षण यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परंतु, प्रशासकीय राजवट येणार की सध्याच्याच नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या निवडणुकीबाबत संभ्रम आणि अनिश्चितता कायम आहे.

शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या सध्याच्या धोरणामुळे कोणत्याही क्षणी कोणताही निर्णय जाहीर होऊ शकतो, असे सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांना वाटते. त्यामुळे या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने स्वतंत्रर१त्या मोर्चेबांधणी करीत असल्याचे दिसत आहे. विद्यमान नगरसेवकांसह उमेदवारीच्या तयारीत असलेले अनेक नवोदितही निवडणूक जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रभाग रचना बदलल्यामुळे आणि प्रभागाचा कच्चा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याने आता सुधारित प्रभागरचना कशी होते, याकडे भावी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग रचना बदलल्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ होणार आहे. प्रभागांच्या संख्येत वाढ होणार असून नगरसेवकांच्या संख्येतही वाढ होणार आहे. मनमाडला संभाव्य १७ ते १८ प्रभागातून ३६ ते ३७ नगरसेवक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतील सभागृहाचे चित्र कसे असेल याची उत्सुकता, विद्यमान तसेच भावी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांना लागली आहे. पालिका प्रशासनाने गूगलचा आधार घेऊन शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार प्रभाग रचनेचा तयार केलेला कच्चा आराखडा नगरविकास विभागाला सादर करण्यात आलेला आहे. प्रभागाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या तसेच प्रभाग निश्चितीसाठी नेमके कसे निकष लावले असतील, याची सध्या अधिकृत माहिती कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. संभाव्य निवडणुकीबाबत तसेच उमेदवारांबाबत प्रभागात चर्चा रंगत आहे. कच्च्या आराखडय़ात दुरुस्त्या, हरकती यानंतर अंतिम  स्वरूप दिले जाणार आहे.

पक्षीय बलाबल..

मनमाड नगरपालिकेत सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. थेट नगराध्यक्षही शिवसेनेचा असून शिवसेना आणि मित्रपक्षांचे २१ जागांवर नगरसेवक आहेत.  पालिकेच्या एकूण ३१ जागांपैकी डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला १८, काँग्रेस पाच, राष्ट्रवादी पाच, रिपाइं आणि अपक्षांना एक जागा मिळाली होती. या ३१ जागांमध्ये ओबीसी सात जागांचा समावेश आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here