मुंबई:
एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडामुळे शिवसेनेच्या अस्तित्त्वालाच नख लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतान त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.
यावेळी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामागे कोणाचा दबाव आहे, सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट आहे. पण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस जगवण्यासाठी, त्याच्या विकासासाठी खूप मोठं योगदान दिले आहे. म्हणूनच त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र येण्याची हीच खरी वेळ आहे. गंभीर परिस्थितीमध्ये भावाने भावाच्या सोबत खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, असे आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना वाटत असल्याचे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना आणि मनसेच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ५६ आमदार निवडून आले होते. त्यापैकी मुंबईतील आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर आमदारांची संख्या ५५ इतकी झाली होती. एकनाथ शिंदे यांनी यापैकी तब्बल ४० आमदार फोडून स्वत:सोबत नेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात एकनाथ शिंदे गट दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास शिवसेनेच्या अस्तित्त्वालाच नख लागेल. त्यामुळे आता आता उद्धव ठाकरे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम