द पॉइंट प्रतिनिधी : गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला मराठा आरक्षण संघर्ष अजूनही शांत झालेला नाही. अद्याप मराठा आरक्षण मुद्द्यावर अपेक्षित निर्णय न झाल्याने, मराठा बांधवांमध्ये असंतोष आहे. आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र लिहून आरक्षणाची ५०% मर्यादा शिथिल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केलेय.
राज्यघटनेनुसार आरक्षणाची मर्यादा ५०% पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणासाठी अद्यापही संघर्ष करावा लागतोय. राज्यघटनेतील ५०% ची आरक्षण मर्यादा शिथिल झाल्यास, आरक्षण मिळणे सोपे होईल, याच अनुषंगाने अशोक चव्हाण यांनी सर्व खासदारांना सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवण्यासाठी आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी राजे भोसले हे मराठा समाजाचे नेतृत्व करताय. त्यासाठी संभाजी राजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात खासदार संभाजी राजे हे केवळ मराठा समाजाचे नेते असल्याचे चित्र वारंवार इतर नेते मंडळींकडून उभे केले जात होते. आपले राजकीय भविष्य अंधारात जाईल, याच भीतीने तर इतर नेते मंडळी आता पुढे येताय का? असा सवाल आता लोकांद्वारे विचारला जाऊ लागलाय.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या आवाहणानंतर राज्यातील खासदार यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार संभाजी राजे यांच्या इशाऱ्यानंतर राज्य शासनाद्वारे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र न्यायालयात पुन्हा बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाची तयारी त्याच प्रकारची असणे गरजेचे आहे. अद्याप पावेतो आरक्षण मुद्द्याचा चेंडू एका मैदानातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून पहिल्या कोर्टातच टोलवला जात असल्याने, त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. याच कारणास्तव अद्याप अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. होऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा अधांतरी राहिलेल्या असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. शासनाद्वारे मागील परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नसल्याने एका विद्यार्थ्यांचा बळीही गेलाय. त्यामुळे मराठा आरक्षण मुद्दा कधी अंतिम निर्णयापर्यंत पोहचणार याची सर्व वाट बघताय.
आता सुरू असलेल्या अधिवेशनात या विषयावर सर्वपक्षीय खासदार आवाज उचलणार का? आरक्षण मर्यादा ५०% च्या वर वाढवणे शक्य आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम