आमदार निलंबन प्रकरणात भास्कर जाधवांची मोठी घोषणा

0
46

मुंबई : काल (28 जानेवारी)राज्यभरातील भाजपाच्या 12 निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. हे निलंबन असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाकडून ते निलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला फटका बसला आहे. मात्र हा निर्णय लागू होईल की नाही याबद्दल अनेक मतमतांतरे सुरू आहेत असे म्हणत शिवसेना आमदार आणि तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव म्हणाले, आपल्या देशात लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. न्यायमंडळ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि पत्रकारिता या चारही स्तंभांना एकमेकांना पूरक काम करून एकमेकांचा आदर करावा लागतो. एकमेकांच्या अधिकारात हस्तक्षेप करू नये, ही घटनेमधील तरतूद आणि अपेक्षा आहे. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय असा निकाल देऊ शकते का? तो विधिमंडळाला बंधनकारक असतो का? यावर चर्चा होईल. त्यामुळे फक्त सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला म्हणून निलंबन रद्द करण्यात आले असे म्हणता येणार नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

या दरम्यान बोलताना भास्कर जाधव यांनी आम्ही निलंबन मागे घेणार होतो असा खुलासा केला.ते म्हणाले, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला परवानगी दिली असती तर कदाचित हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांनी हे निलंबन रद्द केले असते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील आमचे ८ महिन्यांकरिता निलंबन केले होते. परंतु निलंबनानंतर विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्ष, सत्ताधारी नेते चर्चा करतात आणि तोडगा काढून निलंबनाचा कालावधी कमी केला जातो. या निलंबन कारवाईच्या बाबतीत असेच होणार होते’ असे देखील जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांनी यावेळी एक मोठी घोषणा देखील केली. ते म्हणाले, जेव्हा-जेव्हा सरकारला माझ्या अनुभवाची, अभ्यासची आणि निर्णय क्षमतेची गरज भासते तेव्हा ते मला तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवता. पण एकदा का त्या खुर्चीवर बसलो की मी पक्ष बाजूला ठेवून बसतो. यापुढे देखील सरकारला विधानसभेचे नियमित अध्यक्ष मिळेपर्यंत जर भास्कर जाधव यांना तालिका अध्यक्ष करावे असे वाटत असेल तर ती जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडणार परंतू नियमित अध्यक्षांची नेमणूक झाली की पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर जाऊन बसणार नाही, असे त्यांनी घोषित केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here